वाहनधारक व व्यायामासाठी जाणाऱ्या मंडळींनी केली झुडुपे काढण्याची मागणी…
अमळनेर:- क्रीडा संकुलाच्या पुढे धार रस्त्यालगत रस्त्याच्या कडेला काटेरी झुडुपे वाढल्याने त्याठिकाणी मैला, उष्टे अन्न व कचरा टाकण्याचे प्रमाण वाढल्याने व्यायामासाठी पायी फिरायला जाणाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत काटेरी झुडुपे काढण्याची मागणी केली आहे.
शहरातील मोठ्या प्रमाणावर तरुणवर्ग व वयोवृद्ध मंडळी धार रस्त्याकडे सकाळी व सायंकाळी पायी फिरण्यास जात असतात. मात्र या रस्त्याला झुडुपे वाढल्याने आडोसा पाहून घाण टाकणाऱ्याचे प्रमाण वाढले आहे. पावसाळा संपल्यानंतर दरवर्षी साईड पट्ट्यांवरील काटेरी झुडुपे काढण्यात येतात मात्र यंदा सा. बां. विभागाने त्याकडे दुर्लक्ष केले आहे. ह्या झुडपांमुळे रात्रीच्या वेळी वाहनधारकांना वळणावर समोरून येणारी वाहने दिसत नाहीत. तसेच त्याठिकाणी समारंभातील उष्टे अन्न, पत्रावळे, घाण टाकण्याचे प्रमाण वाढले आहे. तसेच एका ठिकाणी शौचालयाच्या टाकीतील मैला ही रस्त्याच्या कडेला उपसण्यात आला आहे. त्यामुळे पायी फिरायला जाणाऱ्या मंडळींनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून संबंधित विभागाने लक्ष देवून ही झुडुपे काढावी व रस्त्याच्या साईड पट्ट्या मोकळ्या करण्याची मागणी केली आहे.
मालपुर ते अंतूर्ली रस्त्यावर बाभुळांचे साम्राज्य…
तालुक्यातील मालपुर ते अंतूर्ली हा तीन किमी रस्ता सुस्थितीत असून मात्र रस्त्याच्या कडेला बाभूळ व काटेरी झुडुपे मोठ्या प्रमाणावर वाढल्याने प्रवाश्यांना व शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. ही काटेरी झुडुपे काढावीत अशी मागणी शेतकरी व ग्रामस्थांनी केली आहे.