अमळनेर:- येथील नाट्यगृहात झालेल्या चोरी प्रकरणी अद्याप पोलिसात तक्रार दाखल न झाल्याने याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते अनंत निकम यांनी प्रांतांना निवेदन दिले.
नाट्यगृहात चोरी झाली असून त्यात साऊंड मिक्सर सिस्टम, कॉलर माईक व इतर महागड्या वस्तू अशी एकूण १६.५० लाखाच्या वस्तू चोरीस गेल्याचे समजते. त्याबाबत अधिकाऱ्यांनी पंचनामा ही केला आहे. मात्र ह्या चोरी प्रकरणात कमालीची गोपनीयता पाळली गेली असून याबाबत मुख्याधिकारी माहिती घेतोय, शोध घेतोय अशी उत्तरे देत विषयाला बगल देत असल्याचे दिसून येत असून यात वेळ घालत प्रकरण थंडबस्त्यात ठेवण्याची भूमिका आहे काय ? तसेच वेळकाढूपणा करून या विषयावर पडदा टाकायचे काम सुरू असल्याची मुख्याधिकारी यांची भूमिका संशयास्पद असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे प्रशासक अधिकारी म्हणून आपल्या स्तरावरून गुन्हा दाखल करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी निवेदनात केली आहे.
अनेकांचे सपशेल मौन…
सदर चोरीची घटना ही गंभीर असूनही अनेकांनी या प्रकरणावर सपशेल मौन पाळले आहे. नागरिकांच्या कराच्या पैशातून उभारलेल्या नाट्यगृहात झालेल्या चोरीबाबत राजकीय नेतेमंडळी ही कमालीची शांत आहेत. सध्या जवळच्या काळात कोणतीही निवडणूक लागल्याची चिन्हे नसल्याने त्यांनी मौन बाळगले आहे का ? असा सवाल जनतेतून विचारला जात आहे.