
जिल्हा किसान काँग्रेसने जिल्हाधिकाऱ्यांना अधिसूचना काढण्याची केली मागणी…
अमळनेर:- तालुक्यातील आठपैकी पातोंडा मंडळातील सुमारे पाच हजार कापूस उत्पादक शेतकरी तांत्रिक दोषामुळे पीक विम्याच्या लाभातून वगळण्यात आल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. जळगाव जिल्हा किसान काँग्रेसने जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना अधिसूचना काढण्याची मागणी केली आहे.

कापूस पीक उत्पादक शेतकऱ्यांना ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी विमा देत नसल्याने जिल्हा किसान काँग्रेसने तीव्र आंदोलन केले होते.सततच्या पाठपुराव्यामुळे शेतकऱ्यांना ७२ कोटी पीक विमा मंजूर झाला. शेतकऱ्यांच्या नावावर २५ टक्के अग्रीम रक्कम ही जमा झाली मात्र अमळनेर तालुक्यातील पातोंडा येथील शेतकऱ्यांच्या नावावर पैसे जमा होत नसल्याने शेतकऱ्यांनी ओरड केली. अनेक शेतकऱ्यांनी याबाबत प्रा. सुभाष पाटील यांच्याकडे तक्रार केली. अधिक चौकशी केली असता अमळनेर तालुका कृषी अधिकारीकडून सर्व आठही मंडळातील शेतकऱ्यांची नावे बरोबर पाठवली गेली. मात्र जिल्हा कृषी अधिक्षकांकडून जाणाऱ्या यादीत अमळनेर तालुक्यातील पातोंडा मंडळातील शेतकऱ्यांचे नाव नसल्याने सुमारे ५ हजार शेतकरी कापूस पीक विमाच्या अग्रिम रक्कम मिळण्यापासून वंचित राहिले आहेत. याबाबत किसान कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश पाटील, कार्याध्यक्ष प्रा. सुभाष पाटील, डॉ अनिल शिंदे, धनगर पाटील, दिनेश पाटील, नितीन पाटील, गुणवंतराव पाटील, राजेंद्र पाटील, सुभाष पाटील, भास्कर बोरसे यांनी जिल्हाधिकारींकडे तक्रार केली आहे. व पातोंडा मंडळातील पात्र शेतकऱ्यांना कापूस पीक विमा मिळण्यासाठी अधिसूचना जाहीर करावी आणि ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीला आदेश द्यावेत, अशी मागणी केली आहे.
दरम्यान जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी तथा तंत्र अधिकारी यांनी ओरिएंटल विमा कंपनीच्या राज्य व्यवस्थापकाला पत्र लिहून जिल्ह्यातील २७ मंडळाची यादी पाठवताना अमळनेर तालुक्यातील पातोंडा मंडळाची नावाचे पान स्कॅन करायचे राहून गेल्याची कबुली दिली असून पातोंडा मंडळातील शेतकऱ्यांना पीक विम्याची २५ टक्के रक्कम अदा करण्यात यावी, असेही पत्रात नमूद केले आहे.

