बारा गावाचे शेतकरी प्रांत कचेरीवर बैलगाड्या मोर्चा आणून करणार उपोषण व आंदोलन…
अमळनेर:- तालुक्यातील फापोरे गावाजवळ असणाऱ्या बोरी नदीवरील ब्रिटीशकालीन वळण बंधाऱ्याच्या कामाला प्रशासकीय मान्यता देण्याचे जाहीर करूनही अद्याप मान्यता न मिळाल्याने अखेर बारा गावांच्या ग्रामस्थांनी दिनांक २३ जानेवारी रोजी प्रांत कचेरीवर बैलगाड्या मोर्चा आणून उपोषण व आंदोलनाचा इशारा निवेदनाव्दारे दिला आहे.
तालुक्यातील धार मालपुर येथील तलावामुळे दहा गावांचे टँकर बंद होऊन जवळपास २५९ एकर एवढ्या क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळतो. मात्र सतत दहा वर्षांपासून पर्जन्याअभावी डिसेंबर महिन्यापासूनच हा तलाव कोरडाठाक पडत असल्याने फापोरे गावाजवळ मृतावस्थेतील बोरी नदीवरील ब्रिटीशकालीन पाटचारी दुरुस्ती करून त्या पाटचारीद्वारे धार- मालपूर पाझर तलाव पुनर्भरण करण्याची कल्पना मालपूर गावाचे माजी सरपंच प्रा. गणेश पवार यांना सुचल्याने त्यांनी समिती स्थापन करत सन २०१८ पासून निवेदने, मोर्चा, उपोषण मार्गाने सतत संघर्ष सुरू ठेवला आहे. शासनाच्या जलसंपदा विभागाने तापी खोरे विकास महामंडळाकडे या पाटचारीचे काम सोपविले असून महामंडळाने यासाठी १.५१ कोटी खर्चाचे अंदाजपत्रक जलसंपदा विभागाकडे पाठविले. लालफितीत तीन-चार वर्षांपासून अडकलेल्या या प्रस्तावाला जलसंपदा विभागाने सन २०२२-२३ मधील मंजूर निधी व निर्माण झालेले दायित्व यांचा विचार करता प्रशासकीय मान्यता असमर्थता दर्शविली. त्याबरोबरच सन २०२३-२४ वर्षात नव्याने फेर प्रस्ताव सादर करण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला होता. त्यानुसार तापी खोरे विकास महामंडळाने फेर प्रस्ताव दाखल केला. मात्र, २०२३-२४ आर्थिक वर्षाचा जानेवारी महिना उजाडला तरीदेखील जलसंपदा विभागाने प्रशासकीय मान्यता दिलेली नाही. त्यामुळे संतप्त बारा गावांच्या ग्रामस्थांनी प्रा. गणेश पवार यांच्या नेतृत्वात २३ जानेवारीला प्रांत कचेरीवर बैलगाडी- हंडा मोर्चा व उपोषणाचा निर्णय घेतला आहे. सदर आंदोलनाबाबत निवेदन प्रांत, तहसीलदार, मंत्री अनिल पाटील, जिल्हाधिकारी, जलसंपदा विभागाला देण्यात आले आहे. या आंदोलनाबाबत प्रा. गणेश पवार हे व त्यांची टीम गावागावात जावून बैठका घेवून जनजागृती करत असून त्यांना परिसरात मोठा प्रतिसाद लाभत आहे.
Related Stories
December 22, 2024