जुन्या वस्ती भागातील नागरिकांचे निवेदन, २६ जानेवारीपासून आंदोलनाचा इशारा…
अमळनेर:- गोकुळधाम सोसायटी मिल कंपाऊंड मधील सांडपाण्यामुळे होणाऱ्या त्रासाबाबत प्रतापनगर जुन्या वस्ती भागातील नागरिकांनी उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड यांना निवेदन दिले आहे.
गोकुळ धाम सोसायटी, मिल कंपाऊंडमधील सांडपाणी गलवाडे रोड लगत असलेल्या गटारीत सोडले जाते. परंतु सदर सांडपाणी हे पुढे न जाता प्रताप नगर जुनी वस्तीत माघारी येते. सदर पाणी अतिशय दुर्गंधीयुक्त आहे. तसेच सदर पाणी वर्षभरापासुन तुंबलेले आहे. वस्तीतील जुन्या इमारतीमध्ये पाझरत आहे. त्यामुळे असणारी घरे केव्हाही कोसळू शक्यता नागरिकांनी व्यक्त केली असून या पाण्यामुळे परिसरात रोगराई पसरत आहे. या ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी पालिकेच्या अधिकाऱ्यांनी अनेकदा केली आहे. मात्र पाण्याचा निचरा झाला नाही व सदर सोसायटीला याबाबत पालिकेने कोणताही जाब विचारला नाही. त्यामुळे आता नागरिकांचा संयमाचा अंत पालिका पहात आहात. शहरात राज्यस्तरीय साहित्य संमेलन, समारंभ साजरा करण्यासाठी शहरात भरपुर अनावश्यक खर्च केला जात आहे. उच्चभ्रू वस्तीला सुंदर करण्याचा अवास्तव खर्च नगरपरिषद करत आहे. तसेच या नागरिकांना जाणीवपूर्वक दुर्लक्षित करत असल्याने २६ जानेवारी पासुन नागरिक आंदोलनास सुरुवात करणार आहोत. तसेच शहरात येणारे लोकप्रतिनिधी यांना देखील ह्या अडचणीचे अवलोकन होईल अशी आंदोलनाची दिशा असेल असा इशारा पालिकेला निवेदनातून नागरिकांनी दिला आहे. या निवेदन देतेवेळी दीपक चौगुले, राजू काझी, दिनेश चौधरी, रियाज खान, असमद शेख, मुख्तार खान,अख्तर नाझीम शेख मोहम्मद, शेख गफ्फार शेख रुस्तम, मेहमूद अली यांच्यासह असंख्य नागरिकांनी हे निवेदन दिले आहे.