धरण जनआंदोलन समितीतर्फे निवेदन तिन्ही संमेलनाच्या संयोजकाना निवेदन…
अमळनेर:- येथे संपन्न होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन व विद्रोही मराठी साहित्य संमेलनासह गझल संमेलनात तापी नदीवरील खांदेशातील शेतकरी कष्टकरी जनतेच्या दृष्टीने अत्यंत जिव्हाळ्याचा निम्न तापी प्रकल्प पाडळसरे धरण जलदगतीने पूर्ण व्हावे म्हणून प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत शासनाने समावेश करण्याचा ठराव संमेलन संयोजकांनी करावा, अशी मागणी धरण जनआंदोलन समितीतर्फे निवेदन देऊन करण्यात आली.यावेळी विद्रोही साहित्य संमेलनात खान्देशच्या शेतकरी कष्टकऱ्यांच्या हिताचे पाडळसरे धरण शासनाने पूर्ण करावे असा ठराव करण्यात येईल असे आश्वासन समितीला देण्यात आले आहे.
पाडळसरे धरण जन आंदोलन समितीचे पदाधिकारी यांनी नुकतीच अभा मराठी साहित्य संमेलन आयोजक मराठी वाङमय मंडळाचे अध्यक्ष डॉ.अविनाश जोशी यांची प्रताप महाविद्यालय येथे संमेलनस्थळी भेट घेऊन महाराष्ट्र शासनाने तातडीने प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेसाठी केंद्राकडे पाठवावा व प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत सदर धरणाचा समावेश होऊन धरणाचे काम युद्ध पातळीवर सुरू व्हावे अशी मागणी केली आहे. डॉ.अविनाश जोशी यांनीही सदर विषयावर चर्चा करू व निर्णय घेऊ असे आश्वासन समितीला दिले.
विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या कार्यालयात विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे राज्य संघटक किशोर ढमाले, मुख्य संयोजक प्रा. लिलाधर पाटील, निमंत्रक रणजित शिंदे यांची भेट घेऊन त्यांनाही सदर मागणीचे निवेदन देण्यात येऊन चर्चा करण्यात आली व खानदेश मधील सहा तालुक्यांचा जिव्हाळ्याचा पाणी प्रश्न सुटावा, यासाठी संयोजकांनी आपल्या संमेलनाच्या अजेंड्यावर सदर ठराव घ्यावा अशी विनंती केली यावेळी विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे संघटक किशोर ढमाले यांनी विद्रोही संमेलनामध्ये शेतकऱ्यांच्या व कष्टकऱ्यांच्या प्रश्नाला प्राधान्य असल्याने धरण नासंदर्भातला ठराव निश्चितपणे केला जाईल असे आश्वासन संमेलन संयोजन समितीच्या वतीने दिले. यावेळी जन आंदोलन समितीचे प्रवर्तक सुभाष चौधरी, हिरामण कंखरे, महेश पाटील, संजय पाटील,प्रविण संदांनशिव, ॲड. रज्जाक शेख, दिपक भोई, सुशील भोईटे, पुरुषोत्तम शेटे, सुधाकर मोरे आदि पदाधिकारी उपस्थित होते. जनआंदोलन समितीच्या वतीने यलगार गझल संमेलनातही पाडळसरे धरणाबाबतचा ठराव व्हावा म्हणून खानदेश साहित्य मंचाचे अध्यक्ष व एल्गार गझल संमेलनाचे संयोजक सदाशिव सूर्यवंशी, संयोजक शरद धनगर यांनाही निवेदन देण्यात येणार आहे.