
वन विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने तरुणाने विहिरीत उतरून दिले जीवदान…
अमळनेर:- तालुक्यातील रामेश्वर शिवारातील शेत विहिरीत तीन काळवीट रात्री विहिरीत पडल्याची घटना घडल्याची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह ग्रामस्थांनी सकाळी धाव घेतली. त्यानंतर प्रदीप नावाच्या मुलांने थेट विहिरीत उडी घेत या तिन्ही काळविटांना जीवदान दिले आहे.

तालुक्यातील रामेश्वर येथील सरपंच यांनी गावातील एका विहिरीत तीन काळवीट पडल्याची माहिती वनपाल पी. जे. सोनवणे यांना दिली. त्यानंतर त्यांनी वनमजूरांसह त्या विहिरीच्या दिशेने धाव घेतली. त्यांच्यासह गावातील पोलीस पाटील व इतर ग्रामस्थ त्यांच्या मदतीला धावून आले. त्यांनी विहिरीत पाहिले असता तीन काळवीट विहिरीत पडलेले दिसले. त्यामुळे त्यांना तेथून बाहेर काढण्यासाठी त्यानी रेस्क्यू ऑपरेशन राबवण्याचे नियोजन केले. यावेळी तेथे असलेला प्रदीप नावाच्या तरुणाने विहिरीत उतरून मोठ्या कसरतीने त्या तीन काळवीटांना बाहेर काढण्यास मदत करून त्यांना जीवनदान दिले. त्यानंतर त्यांना किरकोळ लागल्यामुळे त्यांची पशुवैद्यकीय तपासणी करून त्यांना त्यांच्या अधिवासात सोडण्यात आले. कुत्र्यांपासून बचाव करताना विहिरीत पडल्याचा अंदाज यावेळी व्यक्त करण्यात आला. या तीन्ही काळवीटांवर कुत्र्यांनी हल्ला केला असून त्यांच्यापासून जीव वाचवताना त्यांनी पळ काढला असावा. तर रात्र असल्यामुळे त्यांना विहिरीचा अंदाज न आल्यामुळे ते विहिरीत पडले असावेत, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

