२०२५ पर्यंत पाडळसरे धरणात पाणी अडविण्याचे नियोजन:- उपमुख्यमंत्री अजित पवार…
अमळनेर:- पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाचा कारभार व्यवस्थित चालवत आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीत आणि सप्टेंबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या जागा कशा निवडून येतील यासाठी साथ द्या असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निम्न तापी प्रकल्प पाडळसरे येथे केले.
९७ व्या साहित्य संमेलनासाठी अजित पवार अमळनेर येथे आले होते. ग्रंथ दिंडी सुरू होती तोपर्यंत त्यांनी पाडळसरे धरणावर जाऊन पाहणी केली. प्रकल्पाची पूर्ण माहिती जाणून काही सूचना केल्या. त्यांनंतर सभास्थळी ते बोलत होते. व्यासपीठावर पाणी पुरवठा स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, शिक्षण मंत्री दीपक केसरकर, मदत व पुनर्वसन मंत्री ना अनिल पाटील, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, अधीक्षक अभियंता भदाणे हजर होते. ना. पवार पुढे म्हणाले की, आम्ही सरकार मध्ये सामील झालो नसतो तर पाडळसरे धरणाला विलंब झाला असता. जळगाव व धुळे जिल्ह्यात आर्थिक सुबत्ता यावी, शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान यावे यासाठी प्रकल्पाला निधी अपूर्ण पडू देणार नाही. ५ सरकारी उपसा सिंचन योजना व २ सहकारी उपसा योजना सरकारच्या ताब्यात घेऊन त्या सुरू करण्यासाठी केंद्राची मदत लागेल. महाराष्ट्र ,गुजरात , मध्यप्रदेश या तिन्ही राज्यात नरेंद्र मोदी यांच्या विचारांचे सरकार आहे. त्यामुळे तापीच्या पाणी वाटपाचा प्रश्न अभ्यास करून व चर्चा करून सोडवला जाईल.
यावेळी अनिल पाटील म्हणाले की, निम्न तापी प्रकल्प हा जळगाव धुळे जिल्ह्यातील काही गावांसाठी अत्यंत कायापालट करणारा ठरणार आहे. सुप्रमा मिळाल्याने आणि निधी मिळणार असल्याने आजूबाजूच्या गावात शेतकऱ्यांच्या घरात जी भाकरी खाल्ली जाईल त्यावर अजित पवारांचे नाव असेल. एसएफसी मान्यता मिळाली आहे, केंद्रीय जलआयोगाच्या मान्यतेसाठी प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्यात आला आहे. २०२५ पर्यंत धरणाचे काम पूर्ण होईल लवकरच उपसा सिंचन योजनेचे टेंडर काढले जाईल. पाडळसरे धरण संघर्ष समितीचे सुभाष चौधरी, महेंद्र बोरसे,संजय पाटील, रणजित शिंदे यांनी ना. अजित पवार यांचे स्वागत केले. सूत्रसंचालन विनोद कदम यांनी केले.
क्रीडा संकुलाच्या उर्वरित ३ कोटी रुपयांच्या कामाचे भूमिपूजन…
२ रोजी सकाळी क्रीडा संकुलाच्या उर्वरित ३ कोटी रुपयांच्या कामाचे भूमिपूजन ना. अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ना गुलाबराव पाटील, ना दीपक केसरकर, ना अनिल पाटील जिल्हा क्रीडा अधिकारी हजर होते. २००५ पूर्वी नियुक्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी जुन्या पेन्शनसाठी निवेदन दिले. यासंदर्भात चर्चा झाली असून जी आर मध्ये तरतूद करण्यात येणार असल्याचे ना पवार यांनी सांगितले. सूत्रसंचालन संजय पाटील यांनी केले.