
सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून जीवनयात्रा संपविली…
अमळनेर:- तालुक्यातील कळमसरे येथील विष्णु रामदास चौधरी (वय ६५) यांनी दिनांक ८ रोजी दुपारी १:३० ते २ च्या दरम्यान पिठाची गिरिणीच्या स्टोअर रूमला साडीचे दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली उघडकीस आली.
गेल्या दोन वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणामुळे कधी अतिवृष्टी तर कधी ढगफुटी या मुळे हातातोंडाशी आलेले पीक कुजून वाया गेले, त्यातून बी बियाणे, कीटकनाशके ,खते यांची देणी फेडत नाकी नऊ आले असतानाच पीक कर्ज व हात उसनवारीतुन झालेल्या तीन चार लाखांचा कर्जाचा डोंगर कसा उतरणार या विवंचनेत विष्णु चौधरी हे बऱ्याच दिवसांपासून नैराश्यमय होते. शेतात यावर्षी खर्च करूनही खर्च वजा जाता उप्पन्न न आल्याने ते कर्जबाजारी झाल्याने त्यांनी टोकाची भूमिका घेतली असे कुटुंबियातून सांगितले गेले.
मंगळवारी सकाळी त्यांनी नित्य नियमानुसार मंदीरावर जावून देव दर्शन घेऊन सर्वांची भेट घेतली. त्यांची पत्नी आणि मुलगा लग्ना निमित्त बाहेरगावी गेल्याची संधी साधीत त्यांनी आपल्या स्वमालकीच्या पिठाची गिरिणीच्या स्टोअर रूमला लोखंडी अँगलला साडीच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. दुपारी जेवणाला आले नाहीत म्हणून त्यांचा शोध घेतला असता ते गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसुन आले. त्यांना तात्काळ अमळनेर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता त्यांना डॉक्टरानी मृत घोषित केले. वैद्यकीय अधिकारी डॉ जी एम पाटील यांनी त्यांचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांना सोपविल्यावर गावी रात्री ७:३० वाजता शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. याबाबत मृत विष्णु चौधरी यांचे पुतणे देवीदास चौधरी यांच्या ख़बरीवरुन मारवड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली असून पुढील तपास हवालदार सुनील तेली करीत आहेत .




