मंत्री अनिल पाटील यांच्या प्रयत्नातून आगाराचा होणार कायापालट…
अमळनेर:- एस टी आगाराच्या पुनर्बांधणीकरिता महाराष्ट्र शासनाने ८ कोटी रुपये मंजूर झाल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी दिली. नवीन प्रशासकीय इमारत व विविध सुविधा होणार असल्याने आगाराचे रूप पालटणार आहे.
गेल्या काही वर्षांपासून अमळनेर आगाराची दुरवस्था झाली होती. कार्यशाळा देखील अपूर्ण पडत होती. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नव्हती, सांडपाणी निचरा नीट होत नव्हता, त्याच प्रमाणे वाहन तळ मातीचे असल्याने प्रचंड प्रमाणात धूळ उडून कर्मचारी व प्रवाश्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला होता. म्हणून आगार दुरुस्ती करणे गरजेचे होते. मंत्री अनिल पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा करून आठ कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता मिळवली आहे.
गृह विभागाच्या कार्यासन अधिकारी सारिका मेंढे यांनी १४ फेब्रुवारी रोजी शासन निर्णय जाहीर केला आहे. आठ कोटी रुपयात कार्यशाळेकरिता १० गाळे, प्रशासकीय कार्यालये , वॉशिंग रॅम्प, वाहन परीक्षक कक्ष , आगार व्यवस्थापक निवासस्थान, वाहनतळ काँक्रीटीकरण, पाणी पुरवठा, सांडपाणी व्यवस्था, आगार विद्युतीकरण,फायर फायटिंग, पेव्हर ब्लॉक आदी विकास कामे करण्यात येणार आहेत. इमारत पुनर्बांधणी,कार्यशाळा गाळे, प्रशासकीय कार्यालय, वॉशिंग रॅम्प व वाहन परीक्षक कक्षासाठी ३ कोटी १२ लाख, सदनिका साठी ३० लाख रुपये तर विद्युत, फायर फायटर, पाणी पुरवठा , सांडपाणी व्यवस्था यासाठी ४ कोटी २० लाख ६६ हजार रुपये, काँक्रीटीकरण व पेव्हर ब्लॉक साठी २ कोटी ७ लाख ६५ हजार रुपये खर्च करण्यात येणार आहेत.
काम सुरू करण्यापूर्वी नमुना नकाशा, मांडणी नकाशा, विस्तृत नकाशा वास्तू विशारदाकडून मंजूर करून कार्यकारी अभियंत्यांकडून मान्यता घ्यावी लागणार आहे.जुने बांधकाम तोडण्याचा खर्च याच रकमेतून करण्यात येणार आहे.
कर्मचारी आणि प्रवासी यांची सोय होणार:- मंत्री पाटील…
अमळनेर आगाराला आठ कोटी मिळाल्याने कर्मचारी आणि प्रवासी यांची सोय होणार आहे. त्यांनंतर वाढते प्रवासी पाहता नवीन बसेस मिळवण्यासाठी देखील पाठपुरावा सुरू आहे.
:-अनिल पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री