अमळनेर– येथील पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय, अमळनेर येथील राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांचे निवासी शिबिर दिनांक 14 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारी 2024 दरम्यान दत्तक गाव एकरुखी येथे संपन्न होत आहे.
सक्षम युवा समर्थ भारत शिबिराची थीम असून विद्यार्थ्यांना स्वयंसेवकांना योगासने, श्रम संस्कार, प्रसार व प्रचार माध्यमे, मतदान जनजागृती, पर्यावरण, आपत्ती व्यवस्थापन, शैक्षणिक उपक्रम याचबरोबर बौद्धिक सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यापीठ पातळीवर व शासकीय पातळीवर कार्यरत असलेल्या अनेक बुद्धिजीवी साधन व्यक्तींचे व्याख्याने आयोजित करण्यात आले आहे. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांना लक्षात घेऊन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. निवासी शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी एकरूखी गावाचे सरपंच सुरेश पाटील यांच्या शुभहस्ते उद्घाटन करण्यात आले.
उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी एस पाटील उपस्थित होते. यावेळी दिलीप पाटील, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक श्रीमती मारवडकर, श्रीमती सोनवणे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा डॉ. अस्मिता सरवैया, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा. विजयकुमार वाघमारे, महाविद्यालयाचे विभाग प्रमुख प्रा. डॉ.जगदीश सोनवणे, प्रा डॉ भरत खंडागळे, प्रा. डॉ एस आर चव्हाण, प्रा. डॉ. श्वेता वैद्य, प्रा डॉ अनिता खेडकर, प्रा. डी आर ढगे कार्यक्रमास उपस्थित होते. उद्घाटन कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रा. डॉ. अस्मिता सरवैया यांनी कार्यक्रमांचे प्रास्ताविक केले. निवासी शिबिराच्या माध्यमातून दैनंदिन कार्यक्रमाची माहिती स्वयंसेवकांना व उपस्थितांना करून दिली, राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून गावात राबविण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांची माहिती सांगून विद्यार्थ्यांनी श्रमदान आणि बौद्धिक सत्राबरोबर स्वयं शिस्तीकडे देखील लक्ष दिले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच प्रा. डॉ जगदीश सोनवणे यांनी स्वयंसेवकांना राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे महत्त्व व इतर उपक्रमाविषयी विद्यार्थ्यांना महत्त्व पटवून दिले. उद्घाटन प्रसंगी सुरेश पाटील यांनी विद्यार्थ्यांना आश्वासन दिले की, दत्तक गावात तुम्हाला काही समस्या आल्या त्या आम्ही तत्पर सोडवण्यास उपस्थित आहोत. गाव पातळीवरून तुम्हाला संपूर्ण सहकार्य केले जाईल असे आश्वासन दिले. आणि गेल्या तीन वर्षापासून पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या शिबिरामुळे गाव पातळीवर सकारात्मक बदल घडून आला आहे, त्याबद्दल व्यवस्थापनाचे व प्राचार्यांचे आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. पी एस पाटील यांनी स्वयंसेवकांना सुचित केले की, सात दिवशी निवासी शिबिरामध्ये स्वयंशिस्त अतिशय महत्त्वाची आहे, आपण प्रत्येक व्याख्यानाचा भरभरून लाभ घ्यावा. प्रत्येक विद्यार्थ्यांनी समोर येऊन सूत्रसंचालन, प्रास्ताविक, सांस्कृतिक कार्यक्रम, स्वच्छता अभियान आणि सात दिवसांमध्ये जे काही व्याख्यान आयोजन केलेले आहे, त्या संपूर्ण व्याख्यानाचे लाभ घ्यावा, असे आवाहन केले. विद्यार्थ्यांना परिश्रमाशिवाय पर्याय नाही, शिबिरात विविध उपक्रमांच्या माध्यमातून संपूर्ण गावाचे सर्वे करावा. मतदान जनजागृती करण्यात यावी, गावकऱ्यांना शिक्षणाचे महत्व, गावकऱ्यांसोबत सामाजिक बांधिलकी, महिलांचे आरोग्य, आपत्ती व्यवस्थापनाचे धडे, युवकांशी संवाद, बचत गटातील भगिनींसोबतचा संवाद, सक्षम युवा समर्थ भारत यासाठी प्रत्येक स्वयंसेवकांनी अतिशय मनापासून शिबिराचा लाभ घेण्यात यावा असे मार्गदर्शन करण्यात आले. ग्रामीण सहभागी अध्ययन या विषयावर प्रशिक्षण सत्र प्रा. डॉ. भरत खंडागळे व प्रा. विजयकुमार वाघमारे, डॉ. सागर राज चव्हाण यांनी घेतले. उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सारंग पाटील व आभार प्रदर्शन डॉ. श्वेता वैद्य या स्वयंसेवकांनी केले. शिबिराचे आयोजन आणि नियोजन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ अस्मिता सरवैय्या, प्रा. धनराज ढगे, डॉ श्वेता वैद्य हे कार्यरत असून महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभणार आहे.