अमळनेर:- बियर बार मॅनेजरला चाकू दाखवून एक दारूची बाटली आणि १२५० रुपये रोख जबरीने हिसकावून नेल्याची घटना १६ रोजी रात्री ११ वाजता घडली.
जुना पारधीवाडा येथील रहिवासी दादू उर्फ राजेश एकनाथ धोबी याने बसस्थानकासमोरील बियरबार मध्ये जाऊन दारूची बाटली मागितली. मॅनेजर नंदू चौधरी याने पैसे मागितले असता दादू याने ‘तू मला ओळखत नाही का ?’ म्हणत हातातील चाकूने तुला कापून टाकेल अशी धमकी देऊन दारूची बाटली आणि काउंटर वरील ग्राहकाचे १२५० रुपये जबरीने हिसकावून घेऊन निघून गेला. नंदू चौधरी यांनी मालक पवन चौधरी आल्यावर पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्याने दादू धोबी विरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या वर्षी दादूवर एमपीडीए कारवाई करण्यात आली होती. नुकताच तो कारागृहातून सुटला होता.
पोलीस निरीक्षक विकास देवरे ,तपासाधिकारी पोलीस उपनिरीक्षक अक्षदा इंगळे ,अरुण बागुल, रवींद्र पाटील, दीपक माळी, शरद पाटील,जितेंद्र निकुंभे यांनी आरोपी दादू धोबीला जपान जीन मधून अटक केली होती.