जखमी जयंत पाटीलचे वडील डीवायएसपी कार्यालयासमोर करणार आत्मदहन…
अमळनेर:- शहरात गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या गुन्हेगारीबाबत जनप्रक्षोभ वाढला आहे. सराईत गुन्हेगार शुभम देशमुख याला अटक न केल्यास १ रोजी अमळनेर शहर बंद ठेवण्याचा निर्णय मराठा मंगल कार्यालयात झालेल्या नागरिक व व्यापाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला.
लक्झरी चालक जयवंत पाटील यांच्यावर शुभम देशमुख याने जीवघेणा हल्ला केला ,तसेच दादू धोबी याने चाकुचा धाक दाखवत एकला लुटले , स्टेशन रोड परिसरात झालेला जीवघेणा हल्ला आदी घटनांनी अमळनेर शहरात खळबळ माजली होती. वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते, व्यापारी ,दुकानदार व नागरिक एकत्र येत २५ रोजी मराठा मंगल कार्यालयात बैठक बोलावण्यात आली होती.
या बैठकीत माजी आमदार डॉ बी एस पाटील , मराठा समाजाचे सचिव विक्रांत पाटील , राष्ट्रवादी काँग्रेस चे तालुकाध्यक्ष सचिन पाटील , संभाजी ब्रिगेडचे श्याम पाटील , राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक जिल्हाध्यक्ष भूषण भदाणे , प्रा अशोक पवार , धंनजय सोनार , व्यापारी भरत ललवाणी , राकेश माहेश्वरी ,बाळू कोठारी , सुनील चौधरी , मनोज शिंगाणे , सचिन वाघ , शुभम बोरसे , ऍड शकील काझी , ऍड दिनेश पाटील, पोलीस नाईक डॉ शरद पाटील यांनी आपल्या भूमिका मांडल्या. काही नागरिकांनी खतरनाक गुन्हेगारांचे एन्काऊंटर करा ,अवैध धंद्यांमुळे गुन्हेगारी वाढली ते बंद करा , गुन्हेगारांना राजकीय आश्रय मिळतो आदी मुद्द्यांवर चर्चा केली.
जखमी जयंत पाटील यांचे वडील महेश पाटील यांनी माझ्या मुलावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या शुभम देशमुख याला २९ पर्यंत अटक न केल्यास १ मार्च पासून डीवायएसपी कार्यालयासमोर आत्मदहन करेल असा इशारा दिला. व १रोजी सर्व व्यापारी , दुकानदारांनी आणि नागरिकानी अमळनेर बंद ठेवावे असे आवाहन करताच सर्व संमतीने होकार दिला.
यावेळी पोलीस निरीक्षक विकास देवरे यांनी सांगितले की मी नुकताच बदलून आलो आणि काही गुन्हेगार बाहेर आले. त्यांनी काही अक्षम्य गैरप्रकार केलेत. शुभम देशमुख याला पकडण्यासाठी तीन पथक नेमण्यात आले आहेत. पोलिसांचे सर्वोतोपरी प्रयत्न सुरू आहेत. कोणत्याही गुन्हेगाराची गय केली जाणार नाही आणि राजकीय दबावाला बळी पडणार नाही, असे आश्वासन दिले.