
बाजार समितीपासून तहसील कार्यालयापर्यंत मूक मोर्चा काढत दिले निवेदन…
अमळनेर :- महाराष्ट्र शासनाच्या विधेयक ६४ च्या विरोधात अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापारी, हमाल, मापाडी, गुमास्ता तसेच कर्मचारी संघटनेने २६ रोजी काम बंद आंदोलन पुकारून बाजार समिती पासून तहसील कार्यालयापर्यंत मूक मोर्चा काढत प्रांताधिकारी कार्यालयात नायब तहसीलदार आर एस जोशी यांना मागण्यांचे निवेदन दिले.
शासनाने २०२४ विधेयक ६४ नुसार अधिनियमात सुधारणा करून बाहेर बाजार तळ उभारून शेतमाल खरेदीची परवानगी देण्यात येणार आहे. आणि बाजार समितीला फक्त समिती आवारातच खरेदी करण्याचे बंधन येणार आहे. यामुळे बाहेरची कोणीही व्यक्ती माल खरेदी करणार आहे. शेतकऱ्यांच्या मालाला तसेच पैशाला सुरक्षा नसेल, बाजार समितीचे नियंत्रण नसेल, भाव बाबत हमी नसेल, कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ येईल, बाजार समित्यांवर शासनाचे नियम असल्याने हमाल, मापाडी, गुमास्ता यांना मिळणारा मोबदला नियमाप्रमाणे व कुटुंबाची उपजीविका होईल या पद्धतीने दिला जात आहे. बाजार समितीत शेतकरी तातडीने संचालक मंडळ अथवा सचिवांकडे तक्रार करू शकत होता परंतु नव्या नियंमाप्रमाणे खाजगी बाजार तळांवर नियंत्रण नसल्याने शेतकऱ्यांची फसवणूक झाल्यास त्यांना तातडीने दाद मागता येणार नाही. यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत व्यापारी, संचालक मंडळ, कर्मचारी, गुमास्ता, हमाल, मापाडी यांची बैठक झाली होती त्यात २६ रोजी बाजार समिती बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
तसेच २९ रोजी तहसील कार्यालयासमोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे. आणि यानंतरही विधेयक रद्द न झाल्यास बेमुदत उपोषण करण्याचा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रकाश बोथरा, व्यापारी संचालक वृषभ पारख , प्रकाश वाणी , हमाल संघटनेचे अध्यक्ष रमेश धनगर , संचालक शरद पाटील , मापाडी संघटनेचे अध्यक्ष महादू पाटील, कार्याध्यक्ष प्रभाकर पाटील, गुमास्ता संघटनेचे युवराज पाटील, कर्मचारी संघटनेतर्फे बाजार समितीचे सचिव डॉ.उन्मेषकुमार राठोड, सहसचिव सुनिल सोनवणे, उपसचिव अशोक वाघ,योगेश महाजन, प्रशांत राणे,डिंगबर पाटील, सुरेश शिरसाठ,गणेश पाटील,पंकज बाविस्कर,प्रशांत नेरकर,योगेश इंगळे,निलेश पाटील, दिनेश पाटील,नरेंद्र धनगर, दिपेंद्र पवार,आबा बावा यांच्यासह सर्व व्यापारी, हमाल, मापाडी व कर्मचाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या निवेदनात होत्या.

