चौघांविरुद्ध अमळनेर पोलीसात गुन्ह्याची नोंद…
अमळनेर:- रिक्षाची बॅटरी चोरीबाबत संशय व्यक्त केला म्हणून चौघांनी दोघांना लाकडी दांडा व लोखंडी सळईने मारहाण करून जखमी केल्याची घटना १६ रोजी रात्री साडे नऊ वाजता ताडेपुरा भागात मंगल नगरमध्ये घडली.
शुभम प्रकाश चौधरी याची रिक्षा असून रिक्षाची बॅटरी चोरी गेली होती. त्याबाबत शुभमने पोलिसांजवळ विजय उर्फ बंटी कैलास धनगर याच्यावर संशय व्यक्त केला होता. त्याचा राग आल्याने १६ रोजी रात्री ९ वाजता विजय उर्फ बंटी कैलास धनगर, कैलास राजाराम धनगर, अजय कैलास धनगर, लताबाई कैलास धनगर हे चौघे आले व त्यांनी शिविगाळ करून तुझा दुसरा डोळाही फोडून टाकेल म्हणत विजयने शुभमच्या डोक्यावर, डोळ्यावर व नाकावर लाकडी दांड्याने मारहाण करून दुखापत केली. हे भांडण सोडवायला आलेल्या त्याचे काका वासुदेव चौधरी यांनाही शिवीगाळ करून कैलास धनगर याने हातातील लोखंडी सळईने उजव्या हातावर मारहाण केली. तसेच अजय कैलास धनगर याने घरावर दगडफेक करून कपाटाची काच फोडून नुकसान केले. तर लताबाई व अजय धनगर यांनी शुभमच्या आईला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. उपचारासाठी शुभम व त्याचे काका याना धुळे येथे रवाना करण्यात आले होते. तेथून परत आल्यावर अमळनेर पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून विजय, अजय, कैलास व लताबाई या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हेडकॉन्स्टेबल सुनील पाटील करीत आहेत.