पिंपळी येथील कुटुंबाला मदत करण्यासाठी दानशूर दात्यांना ग्रामस्थांनी केले आवाहन…
अमळनेर:- तालुक्यातील पिंपळी येथे आग लागून सारे काही गमावलेल्या परिवाराच्या मदतीला गावकरी आणि समाजसेवक धावले आहेत. समाजाकडून आणखी मदतीची अपेक्षा केली जात आहे.
२४ मार्च रोजी सायंकाळी साडे सहा वाजेच्या सुमारास सिलिंडरचा स्फोट होऊन दिलीप नामदेव पाटील यांच्या घराला मोठया प्रमाणात आग लागली. आगीने रौद्र रूप धारण केल्याने गावकऱ्यांनी प्रयत्न करूनही आग नियंत्रणात येत नव्हती. बराच वेळ गेल्यानंतर घरमालक दिलीप पाटील आणि घरातील साहित्य, कपडे, धान्य, गृहोपयोगी वस्तू व इतर साहित्य जळून राख झाले होते. दिलीप पाटील यांचा परिवार उघड्यावर आला होता. तात्पुरता कोणी जेवणाची तर कोणी कपड्यांची मदत केली. दुसऱ्या दिवशी गावकरी एकत्र आले त्यांनी रोख रक्कम आणि धान्य गोळा करून त्या कुटुंबाला मदत केली. तर बालाजी ग्रुपने देखील ११ हजार रुपयांची मदत केली. अमळनेरच्या जायन्टस ग्रुपने देखील किराणा माल, रोजच्या वापरायचे कपडे व इतर साहित्याची मदत केली. संपूर्ण कुटुंबाची गाडी रुळावर येण्यासाठी आणखी मदतीची गरज असून सामाजिक कार्यकर्त्यांनी व दानशूर दात्यांनी मदत करावी असे आवाहन गावकऱ्यांतर्फे करण्यात आले आहे.