
नगाव शिवारात गावठी दारूच्या भट्ट्या अमळनेर पोलिसांनी केल्या उद्ध्वस्त…
अमळनेर:- अमळनेर पोलिसांनी जळोद येथे नाकाबंदी दरम्यान शिरपूरच्या दोघा तरुणांना १ लाख २० हजार रुपयांच्या गांजासह रंगेहाथ पकडले. तर नगाव शिवारात गावठी दारूच्या भट्ट्यावर छापा टाकून कारवाई केली आहे.

तालुक्यातील जळोद गावाजवळ दोन जण मोटरसायकलवर गांजा विक्रीसाठी अमळनेर येथे येत असल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी मोटरसायकल (क्रमांक एमएच १८ वाय ९८४८) हिच्यावर साजन राजू पावरा (वय २१) व विशाल कुवरसिंग पावरा (वय २०) दोन्ही रा. रोहिणी पोस्ट शिरकण पाडा येताना आढळले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याजवळ १ लाख २० हजार रुपये किमतीचा ७ किलो ९९० ग्रॅम गांजा आढळून आला. पोलिसांनी दोघांजवळील गांजा, ५० हजार रुपयांची मोटरसायकल व ५ हजार रुपयांचा मोबाईल असा एकूण १ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. दोघा तरुणांना अटक करण्यात आली. या कामी पोलिसांना एफएसटी पथकाचे सहकार्य लाभले. डीवायएसपी सुनील नंदवाळकर यांच्या आदेशाने पोलीस निरीक्षक विकास देवरे , सहा पोलिस निरीक्षक अजित सावळे, हेकॉ किशोर पाटील, सिद्धांत शिसोदे ,जितेंद्र निकुंभे, मिलिंद बोरसे, हर्षल पाटील, सुनील महाजन यांनी ही कारवाई केली.
तर नगाव ते चांदणी कुऱ्हे रस्त्यावर चिखली नदी काठी झाडा- झुडुपांमध्ये दारूच्या हातभट्टी सुरू असल्याची माहिती मिळताच पोलिसांच्या पथकाने
सुकलाल वामन शिंदे यांच्याकडे धाड टाकली. त्याच्याजवळ १४ हजार रुपये किमतीचे २०० लिटर कच्चे रसायन, ६ हजार रुपयांची ६० लिटर दारू, वामन मच्छिंद्र शिंदे यांच्याकडे १७ हजार ५०० रुपये किमतीचे ३५० लिटर कच्चे रसायन, १० हजार रुपयांची १०० लिटर गावठी दारू, तसेच राजेंद्र कांतीलाल शिंदे यांच्याकडून १५ हजार रुपयांची ३०० लिटर रसायन, ९ हजार रुपयांची दारू असा मुद्देमाल जप्त केला. तिन्ही हातभट्टीवरील प्लस्टिक ड्रम, दारू गाळण्याचे साहित्य याची तोडफोड करून भट्टया उध्वस्त केल्या. तर नगाव येथे पोलीस निरीक्षक विकास देवरे,अमोल पाटील, सुनील पाटील, विजय भोई,हितेश चिंचोरे, प्रमोद पाटील, राजेंद्र देशमाने, मधुकर पाटील यांच्या पथकाने गावठी दारू भट्ट्या उध्वस्त केल्या.

