५१ हजार रुपये रिचार्ज वेलसाठी व ॲस्ट्रोनॉमी लॅबसाठी ४ लाख रुपयांचे साहित्य मंजूर…
अमळनेर:- पाणी टंचाईवर मात करण्यासाठी नदी नाल्यातून वाहून जाणारे पाणी जमिनीत जिरविण्यासाठी सामाजिक दायित्व समजून एकजुटीने मारवड येथे आयकर अप्पर आयुक्त संदीप साळुंखे, डीवायएसपी स्वर्गीय गिरीश पाटील व अभियंता विजय भदाणे या त्रिमूर्तीच्या संकल्पनेतुन मारवड विकास मंचची स्थापना मावळ्यांनी करून माळण नदी नांगरून, गाळ काढुन, बंधारे बांधून तलाव निर्माण करीत रिचार्ज शॉप्टचा (रिचार्ज वेल) प्रयोग यशस्वी केला व त्यातून भूगर्भातील भूजल पातळीत वाढ घडवून आणली यातून पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी मदत तर झालीच परिणामी विहिरीची व कूपनलिकांची भूजल पातळी वाढल्याने निष्काम भावनेतून काम करणाऱ्या मावळ्यांनी उमेद निर्माण झाली. या कामाची दखल पुणे सहकार नगरच्या लायन्स क्लबने घेऊन क्लबच्या २९ व्या वर्धापनदिनी मारवड विकास मंचला विशेष निमंत्रण देऊन लायन्स क्लबच्या मान्यवरांच्या हस्ते “लायन्स एक्सललेंट अवार्ड फॉर सोशल वर्क २०२१” देऊन गौरविण्यात आले. तर ५१ हजार रुपयांचा चेक रिचार्ज वेल साठी तसेच परिसरात अद्ययावत अस्ट्रोनोमी लॅब प्रयोगशाळा उभारणीसाठीचे जवळपास ४ लाख रुपयांचे साहित्य मंजूर करून मारवड विकास मंचच्या सामाजिक कामाला हातभार लावला आहे.
दि. १८ फेब्रुवारी पुणे येथे लायन्स क्लबच्या सहकार नगर येथील कार्यालयात झालेल्या २९ व्या वर्धापनदिनाच्या दिमाखदार सोहळ्यात लायन्स क्लबचे चेअरमन प्रतापराव शिंदे, डिस्ट्रिक्ट गव्हर्नर हेमंत नाईक, सहाय्यक गव्हर्नर सी डी सेठ, विभागीय चेअरमन नीता शहा, क्लबच्या सेक्रेटरी श्रध्दा शहा, जयश्री दिवाकर, चेअरपर्सन शैला शेठ यांच्याहस्ते अडीच फुटाची आकर्षक ट्रॉफी, सन्मानपत्र , ५१ हजारांचा धनादेश मारवड विकास मंचच्या मावळ्यांच्या हातात देऊन गौरविण्यात आले, अस्ट्रोनोमी लॅब साठी जवळपास ३.५० ते ४ लाख रुपयांचे साहित्य मंजूर केले आहे. अमळनेर तालुक्यातील मारवड विकास मंचच्या कामाची दखल घेऊन पुणे लायन्स क्लबने विशेष अवार्डने सन्मान करून गौरविण्यात आल्याने विकास मंचच्या मावळ्यांच्या उमेदिला बळ मिळाले आहे, यामुळे सर्व तालुक्यासह जिल्ह्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.