धनदाई कॉलेजमध्ये “उत्सव लोकशाहीचा” कार्यक्रम संपन्न….
अमळनेर:- “मतदान हे आपले राष्ट्रीय कर्तव्य असून लोकशाहीच्या या उत्सवात सहभागी होऊन आयुष्यातील पहिले मतदान अविस्मरणीय करण्याचा प्रयत्न करू तसेच इतरांना देखील यासाठी प्रेरित करू” अशा आशयाची प्रतिज्ञा प्रथमच मतदान करणाऱ्या युवकांनी केली.
शहरातील धनदाई कला व विज्ञान महाविद्यालयात “उत्सव लोकशाहीचा” या मतदार जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. लिलाधर पाटील, युवती सभाप्रमुख प्रा. मीनाक्षी इंगोले तर जनजागृती गीत सादर करण्यासाठी कवी अजय भामरे आदी मान्यवर उपस्थित होते.
‘लोकशाही प्रक्रियेत मतदान हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा असून लोकशाही बळकट करण्यासाठीचा तो कणा असल्याने सर्व तरुणांनी या प्रक्रियेत उत्स्फूर्त सहभाग घ्यावा व इतरांना देखील प्रेरित करावे’ असे आवाहन डॉ. लीलाधर पाटील यांनी याप्रसंगी केले. जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनानुसार “ताबुल रसा” या उपक्रमांतर्गत आयोजित विविध उपक्रमात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी मतदान जागृती विषयक पोस्टर्स तयार केले. त्याचप्रमाणे “लोकशाहीचा मान राखू ,मताचा अधिकार बजावू”, “मतदान करू हक्काचे, भविष्य घडवू देशाचे”, “देश घडवणारच, मताधिकार बजावणारच” या सारखे अनेक घोषवाक्य विद्यार्थ्यांनी तयार केले व याच आशयाच्या घोषणा दिल्या.
याप्रसंगी कवी अजय भामरे यांनी “मतदार राजा होऊ,घटनेची आण घेऊ, मताधिकार बजाऊ या हो , मताधिकार बजाऊ या हो” हे स्वरचित गीत सादर केले. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी टाळ्या वाजवून त्यांना उत्स्फूर्त अशी दात दिली. यानंतर उपस्थित विद्यार्थ्यांनी मतदान प्रक्रियेत स्वतः सहभागी होऊन इतरांना देखील त्यासाठी खरेदी करू या आशयाचे संकल्प पत्र भरून दिले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रा. रविंद्र कासार व राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी विशेष प्रयत्न केले.