जेसीबीद्वारे फुलांचा वर्षाव,स्मिता वाघांसाठी मंत्री अनिल पाटलांनी घातली साद…
अमळनेर:- जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार स्मिता उदय वाघ यांना जाहीर समर्थन देण्यासाठी भव्य सर्वपक्षीय अस्मिता बाईक महारॅलीने संपूर्ण अमळनेरकरांचे लक्ष वेधले.सदर रॅलीवर विविध ठिकाणी जेसीबीद्वारे फुलांचा वर्षाव करण्यात आला.
अमळनेरच्या अस्मितेसाठी आणि अमळनेर भूमीचे खासदारकीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्मिता वाघांनाच मतदान करा अशी साद मंत्री अनिल पाटलांनी तमाम अमळनेरकराना घातली.काल प्रचाराचा अखेरचा दिवस असताना स्मिता वाघांच्या पाठीशी संपूर्ण तालुका असल्याचे दर्शविण्यासाठी या सर्वपक्षीय अस्मिता बाईक महारॅलीचे आयोजन करण्यात आले होते. मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली व महायुतीच्या उमेदवार स्मिता वाघ आणि गुजरात लिंबायत मतदारसंघाच्या आमदार सौ संगीता पाटील व जि प सदस्या सौ जयश्री पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर महारॅली काढण्यात आली.रॅलीत सर्व प्रमुख नेते सजविलेल्या ओपन जिप्सीत विराजमान झाले होते तर या जिप्सीच्या सारथी भाजयुमोच्या प्रदेश सचिव भैरवी वाघ पलांडे या झाल्या होत्या. रॅलीसाठी श्री मंगळग्रह मंदिर परिसरात सकाळी 7 पासूनच दुचाकीधारक येण्यास सुरुवात झाली होती अखेर सकाळी 10 वाजता मंत्री पाटील व स्मिता वाघ यांचे आगमन झाल्यानंतर जोरदार घोषणाबाजी करीत शेकडो दुचाकींचा सहभाग असलेल्या रॅलीस सुरुवात करण्यात आली. सदर रॅलीत प्रत्येकाच्या हाती विविध पक्षांचे झेंडे,नरेंद्र मोदी व स्मिता वाघांचे फोटो असलेले कटआऊट्स तसेच गळ्यात फटके टाकलेले होते,विशेष म्हणजे महिला देखील दुचाकी घेऊन सहभागी झाल्या होत्या. सुरवातीला सिंधी कॅम्प,पैलाड नाका,ताडेपुरा परिसर,पैलाड परिसर, फरशी पूल येथे जेसीबीद्वारे फुले टाकून कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत केले. त्यानंतर सदर रॅली सराफ बाजार,वाडी चौक,माळीवाडा, झामी चौक,पवन चौक,तिरंगा चौक, वड चौक,शिवाजी नगर, भालेराव नगर,गुरुकृपा कॉलनी, त्यानंतर विविध भागात जाऊन महाराणा प्रताप चौकात देखील जेसीबीद्वारे फुलांचा वर्षाव करत जोरदार स्वागत झाले,वाटेत ठिकठिकाणी फटाक्यांची आतषबाजी देखील करण्यात आली.त्यानंतर स्टेशन रोड, नाट्यगृह, ढेकू रोड,पिंपळे रोड नंतर मार्केट समोर स्वर्गीय उदय बापू वाघ यांच्या स्मारक स्थळी समारोप करण्यात आला.यावेळी प्रचंड घोषणाबाजीने सारेच रस्ते दणाणले होते,शेवटपर्यंत स्मिता वाघ व अनिल पाटील यांच्या नावाचा जयघोष सुरू होता.शेवटी सर्वानी उदय वाघ यांच्या स्मारक स्थळी अभिवादन केले.
यावेळी मंत्री अनिल पाटील यांनी 13 तारखेला आपल्याला यंदा केवळ अस्मितेसासाठी स्मिताताईंना मतदान करायचे असून मोदीजीना पुन्हा सन्मानाने पंतप्रधानपदी विराजमान करावयाचे आहे.13 रोजी सकाळी आपणही लवकर घराबाहेर पडा आणि इतरांना देखील काढून जास्तीतजास्त मतदान करा असे आवाहन केले.सदर रॅलीत भाजप,राष्ट्रवादी, शिवसेना शिंदे गट यासह इतर पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते,व्यापारी बांधव,शेतकरी व नोकरदार वर्ग आणि महिला भगिनी अतिशय मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सदर महा रॅलीची चर्चा संपूर्ण तालुका व जिल्ह्यात झाली,या रॅलीने भाजप उमेदवाराची जोरदार वातावरण निर्मिती झाली.