अमळनेर:- अमळनेर विधानसभा मतदारसंघात’ लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव ‘ या थिमवर आदर्श मतदान केंद्र उभारण्यात आले होते. तर मतदान झाल्यानंतर सेल्फी पॉइंट पर मोठ्या संख्येने सेल्फी काढण्यासाठी गर्दी झाली होती
मतदानासाठी सकाळी मोठी गर्दी झाली होती. दुपारी उन्हामुळे तुरळक मतदार मतदान केंद्रांवर फिरकले. मात्र चार वाजेनंतर मतदारांच्या मोठ्या गर्दीमुळे मतदानाच्या आकडेवारीत बरीच वाढ झाली. बहुसंख्य मतदारांनी मतदान झाल्यानंतर उत्साहात सहकुटुंब सेल्फिचा आनंद घेतला. नामदार अनिल पाटील यांनी मूळगावी हिंगोणे येथे सकाळी नऊ वाजता मतदान केले. तर उमेदवार स्मिता वाघ यांनी डांगर येथे मतदान केले. यावेळी डांगर येथे गावाची स्नुषा उमेदवार असल्याने मतदारांत मोठा उत्साह दिसून आल्याने गावाची मतदानाची टक्केवारी वाढली.तर रा. काँ. शरद पवार गटाचे सचिन बाळू पाटील यांनी शासनाचा निषेध करत कापसाच्या माळा घालून मतदान केले.
सरस्वती विद्या मंदिरात मतदारांचे उत्साहात स्वागत…
लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सवात आपले हार्दिक स्वागत करीत असल्याच्या प्रवेशद्वारावरील स्वागत कमानीतून लाल कार्पेटवरून मतदारांचा होणारा स्वागत मंडपातील प्रवेश उत्साह वाढवणारा होता. तर सदर स्वागत मंडपात मतदान विषयक जागृतीचे लावलेले पोस्टरही लक्षवेधी ठरत होते. सरस्वती विद्या मंदिर च्या झाडांनी भरलेल्या शाळा परिसरात सर्वत्र तिरंगी फुग्यांच्या माळा पताक्यासारख्या मोठ्या प्रमाणात लावण्यात आलेल्या होत्या तर मतदान केंद्रातील बूथ मध्येही तिरंगी फुग्यांनी करण्यात आलेली सजावट, मतदान केंद्र परिसरात काढण्यात आलेली माझे मत माझी ताकद, चला मतदानाला जाऊया हा संदेश देणारी भव्य रांगोळी, मतदान केंद्रातील वर्गांमध्ये अंथरण्यात आलेली लाल मॅट मतदारांचा उत्साह वाढवणारे होते. अपंग मतदारांसाठी रॅम्प व स्वतंत्र अपंग सायकलीचा वापर करण्यात येत होता. तर सर्वांसाठी थंड पाण्याचे बॅरल ची सोय तसेच स्त्री व पुरुषांकरिता स्वतंत्र स्वच्छतागृहाची सोय मतदान केंद्राच्या आवारात उपलब्ध होती.
शंकर नगर येथील सरस्वती विद्या मंदिर शाळेच्या या आदर्श मतदान केंद्र सरस्वती विद्या मंदिरचे मुख्याध्यापक रणजित शिंदे व कर्मचारी वृंद यांनी युनियन बँक ऑफ इंडिया अमळनेर शाखा व्यवस्थापक व कर्मचारी वृंद, श्रीराज शिक्षण प्रसारक मंडळ अध्यक्ष अशोक पाटील यांच्या सहकार्याने तसेच तहसिल कार्यालय, नगर परिषद यांच्या मार्गदर्शनाने उभारण्यात आले होते.