शेती निविष्ठा खरेदी करताना काळजी घेण्याबाबत करणार जनजागृती…
अमळनेर:- येथील मंगळग्रह सेवा संस्था व तालुका कृषी विभाग अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मंगळ कृषी जनजागृती रथाची सुरुवात १७ रोजी सकाळी १० वाजता मंगळ ग्रह मंदिरातून करण्यात आली.
उपविभागीय कृषी अधिकारी चंद्रशेखर साठे यांनी हिरवा झेंडा दाखविला. मंदिराचे पुरोहित गणेश जोशी यांनी रथाचे विधिवत पूजन केले. यावेळी तालुका कृषी अधिकारी चंद्रकांत ठाकरे, मंगळ ग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले, सहसचिव दिलीप बहिरम, खजिनदार गिरीष कुलकर्णी, विश्वस्त अनिल अहिरराव, ग्रिनरी कन्सल्टंट सुबोध पाटील, कृषी सहाय्यक महेंद्र पवार, चेतन चौधरी, निलेश पाटील आदी उपस्थित होते.
या रथयात्रेद्वारे अमळनेर तालुक्यातील १५४ गावांना भेट देऊन तेथील शेतकऱ्यांमध्ये शेती निविष्ठा खरेदी करताना काय काळजी घ्यावी? याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे.
शेती निविष्ठा खरेदी करताना ‘अशी’ घ्या काळजी…
यंदाच्या खरीप हंगामाच्या नियोजनास सुरुवात झालेली आहे. हंगाम उत्तम होण्यासाठी “शुध्द बीजापोटी फळे रसाळ गोमटी” या म्हणीप्रमाणे शुद्ध, निरोगी व सशक्तचबियाणेच घ्यावे, पिकांची योग्य काळजी घेतल्यास चांगले उत्पन्न येऊ शकते, त्यासाठी लागणाऱ्या विविध प्रकारच्या निविष्ठा खरेदी करताना काळजी घेण्याचे आवाहन या रथाद्वारे केले आहे.
सोबतच आपल्या भागासाठी कृषी विभाग / कृषी विद्यापीठ यांनी शिफारस केलेल्या, जास्त उत्पादन देणाऱ्या वाणाची जमिनीच्या प्रतवारीनुसार निवड करावी. अधिक उगवण क्षमता असणाऱ्या वाणाचीच निवड करावी. अधिकृत बियाणे विक्रेते यांच्याकडूनच बियाणे खरेदी करावे. बियाणे खरेदी केल्यानंतर विक्रेत्याकडुन त्याची बिल पावती घ्यावी. त्या बिल पावतीचे हंगाम पूर्ण होईपर्यंत जतन करावे. बियाणे खरेदी केल्यानंतर बियाणे पिशवी, सीलबंद असल्याची खात्री करुन घ्यावी. खरेदी केलेल्या बियाण्याच्या पिशवीवरील लेबल नीट वाचावे. त्यावरील त्याची उगवणक्षमता शुद्धतेची टक्केवारी, जात, वजन, कंपनीची माहिती, बियाणे उत्पादनाची तारीख व वापरावयाची अंतिम तारीख यांची तपासणी करुन घ्यावी. बियाणे वापरताना बियाणे पिशवी खालच्या बाजूने फोडावी. त्यामुळे बियाण्याची सर्व माहिती / लेबल सुरक्षित राहते व ते सर्व हंगाम पूर्ण होईपर्यंत सुरक्षित ठेवावेत. एचटीबीटी कापूस वाणाचे अवैधरित्या व विना बिलाने खरेदी करु नये, असेही आवाहन या जनजागृती रथाद्वारे करण्यात येत आहे.