
सिल्लोड येथील दोघांना पकडले, साडे तीन लाखाचा ऐवज केला जप्त…
अमळनेर:- विना परवाना तीन गायींना वाहनात दाटीने कोंबून त्यांच्या हाल अपेष्टा करत वाहतूक करणाऱ्या सिल्लोड येथील दोघांना पोलिसांनी पकडून प्राणी संरक्षक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे तर वाहनसह तीन गायी असा साडे तीन लाखाचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

उदय बोरसे व समाधान पाटील या दोन्ही पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार त्यांनी २५ रोजी सकाळी साडे पाच वाजेच्या सुमारास सावखेडा गावाच्या शिवारात कुसुमाई पेट्रोल पंपाजवळ चोपडयाहून अमळनेर कडे येणारे पिकअप वाहन (क्रमांक एम एच २१ बी एच ७०१२) अडवली. त्यात तीन गायी दाटीवाटीने कोंबलेल्या होत्या. एकमेकांच्या घर्षणाने गायींना वेदना होत होत्या. चालक व क्लीनर याना नावे विचारले असता त्यांनी त्यांची नावे अनुक्रमे सुनील केशवराव आव्हाड (वय २३ रा सरकारी दवाखाण्याजवळ स्नेहनगर सिल्लोड जि छत्रपती संभाजीनगर) व सागर श्रीमंत मगरे (वय २९ रा राजवाडा अजिंठा ता सिल्लोड) अशी सांगितली. त्यांच्याजवळ गुरे वाहण्याचा परवाना नव्हता. या गायी ते सनावद जिल्हा बडवाणी येथून गाडखेडा ता सिल्लोड येथे राहुल कडुबा इंगळे रा शिवना याच्याकडे नेत असल्याचे सांगितले. पोलिसांनी प्रत्येकी १५ हजार रुपये प्रमाणे ४५ हजार रुपयांच्या तीन गायी व तीन लाख रुपयांचे पीक अप वाहन जप्त करून चालक व क्लीनर विरुद्ध प्राण्यांना क्रूरतेची वागणूक प्रतिबंधक अधिनियम १९६० च्या कलम ११(१)(ड)(ई)(फ)(क) मुंबई पोलीस कायदा कलम ११९ , मोटर वाहन कायदा ६६/१९२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेडकॉन्स्टेबल सुनील जाधव करीत आहेत.



