कडुलिंबाचे एक लाख बीजारोपण करण्याचा केला संकल्प…
अमळनेर:- शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक व पर्यावरण क्षेत्रात नेहमीच भरीव योगदान देणाऱ्या न्यू व्हिजन इंग्लिश मिडीयम स्कुलने येत्या शैक्षणिक वर्षाच्या सुरवातीला अमळनेर तालुका परिसरात कडुलिंबाचे नंदनवन साकारण्याचा संकल्प केला असून यासाठी कडुलिंबाचे 1 लाख बीजरोपन शेतजमिनी व वन्य परिसरात केले जाणार आहे.
न्यू व्हिजन स्कुलचे अध्यक्ष तथा निसर्गप्रेमी शितल देशमुख यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात येणार असुन यासाठी निसर्ग मित्र मंडळाचे सहकार्य लाभणार आहे.रखरखत्या उन्हात आमच्या पुढच्या पिढीला एसी कुलरचा कृत्रिम गारवा नको नैसर्गिक गारवा मिळावा आणि आजचा युवा तथा उद्याच्या शेतकरी राजास वरुण राजाचा भरभरून कृपा आशीर्वाद मिळून तो सुखी व समृद्ध व्हावा यासाठीच हा उपक्रम राबविण्याचा निर्णय न्यू व्हिजन स्कुलने घेतला आहे.सदर उपक्रमांतर्गत येत्या जुन महिन्यात पहिला पाऊस झाल्यानंतर शाळेतर्फ कडूलिंबाचे बीज उपलब्ध करून बीज खराब होऊ नये म्हणून 1 लाख विशिष्ट गोळे तयार करण्यात येणार आहे आणि त्या गोळ्यात कडुलिंबाचे बीज टाकण्यात येणार आहे.त्यानंतर मुलांच्या वयोगटानुसार टीम करून तसेच विद्यार्थ्यानी सांभाळून ठेवलेल्या बिया व शाळा परिसरातील लिंबोळ्या संकलन करून त्यांना ग्रामिण भागात शेती बांधावर तसेच ज्या ठिकाणी जंगल परिसर आहे तेथे नेण्यात येऊन मुलांच्या हातूनच बीज रोपण केले जाणार आहे. यातून पर्यावरणालाही हातभार लागेल आणि मुलांमध्ये देखील वृक्षारोपणची आवड निर्माण होईल हाच प्रयत्न आहे.
दरम्यान गेल्या काही वर्षांपासून कमी पर्जन्यमानामुळे अमळनेर तालुका नेहमीच दुष्काळाच्या कचाट्यात सापडला असून दोन तीन वर्षांपासून दर उन्हाळ्यात तापमानाची पातळी देखील भयंकर वाढत आहे.हे थांबवायचे असेल तर वृक्षारोपण, वृक्षलागवड आणि वृक्ष संगोपन याशिवाय पर्याय नसून त्यासाठीच न्यू व्हिजन स्कुल कुठेतरी खारीचा वाटा उचलण्यासाठी सज्ज झाली असून इतर शाळा व संस्थांनी आणि मित्र मंडळांनी देखील हा पर्यावरण वाढीचा उपक्रम राबवावा असे आवाहन स्कुलचे अध्यक्ष शितल देशमुख,चेअरमन निलेश लांडगे व प्राचार्या प्रेरणा पाटील यांनी केले आहे.