मराठी सिने अभिनेत्री किशोरी शहाणे यांच्याहस्ते २४ मान्यवरांचा सन्मान…
अमळनेर:- जळगाव येथे ‘आस बहुउद्देशीय विकास संस्था’, ‘प्रीतम पब्लिकेशन प्रायव्हेट लिमिटेड’, आणि ‘सप्तरंग मराठी चैनल आयोजित’, खान्देशातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय काम केलेल्या 24 व्यक्तींचा मराठी सिने अभिनेत्री किशोरी शहाणे यांच्या हस्ते “खान्देशीयन ऑफ द इयर 2024” हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या कार्यक्रमात अमळनेर तालुक्यातील आरोग्य सेविका सुवर्णा धनगर ह्या वाळकी (प्राथमिक आरोग्य केंद्र हातेड अंतर्गत) येथे कार्यरत असून त्यांना “खान्देशीयन ऑफ द इयर 2024” मराठी सिने अभिनेत्री किशोरी शहाणे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. आदिवासी क्षेत्रातील त्यांचे कार्य उल्लेखनीय असून आदिवासी क्षेत्रातील महिलांचे समुपदेशन, शाळेतील मुला – मुलींचे आरोग्य विषयी व स्वच्छतेविषयी मार्गदर्शन, मुलींना मासिक पाळी संदर्भात समुपदेशन, ग्रामसभा घेऊन गावातील सर्व लोकांना आरोग्यविषयी जनजागृती, मुलींचे हिमोग्लोबिन चेक करून पुढील आहाराविषयी मार्गदर्शन करणे, नेहमी आपल्या कार्यात प्रामाणिकपणे काम करून इतरांना ते आरोग्यविषयक सल्ला देत असतात. त्यांनी जुळ्या मुलांची प्रसुती सुद्धा यशस्वीरित्या केलेली आहे. याच वर्षी “मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा” या उपक्रमांतर्गत चोपडा व अमळनेर तालुक्यातील अनेक शाळांना भेटी देवून मुलांना स्वच्छतेविषयी व मुलींना मासिक पाळी संदर्भात समुपदेशन केलेले आहे. त्यांनी कोरोना काळात सर्व समाज आपले कुटुंब समजून केलेल्या कार्याबद्दल सुद्धा त्यांचे विविध क्षेत्रातील समाजाकडून त्यांचे कौतुक करण्यात आले होते. ही सर्व कामे पाहता त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांचे पती आनंदा बापू धनगर हे आदर्श माध्यमिक शिक्षक असून त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल समाजातील असंख्य पदाधिकाऱ्यांकडून त्यांचे अभिनंदन व कौतुक होत आहे.