दोन्ही चोरांना दिले मध्य प्रदेश पोलिसांच्या ताब्यात..
अमळनेर:- फक्त एका कॉलवरून तांत्रिक यंत्रणेच्या साहाय्याने अमळनेर पोलिसांनी मध्यप्रदेशातील ३० लाखांच्या ट्रक चोरांना पकडून मध्यप्रदेशातील पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
२४ एप्रिल रोजी मांडळ येथील एस एस टी पथकाला लोखंडी सळया भरलेला ट्रक संशयास्पदरित्या आढळून आला होता. पोलिसांनी अडवताच चालक फरार झाला होता. इंदोर आणि धार जिल्ह्याच्या दरम्यान बेटमा येथून इम्रान मोहम्मद शेर मोहम्मद यांच्या घरासमोरून १२ टन लोखंडाने भरलेला ट्रक क्रमांक एम पी ४० जी ए ७७८ २४ रोजी चोरीस गेला होता. एसएसटी पथकाने ट्रकसह ३० लाखाचा माल जप्त करून मारवड पोलीस स्टेशनला जमा केला होता. डीवायएसपी सुनील नंदवाळकर व सहा पोलीस निरीक्षक शितलकुमार नाईक यांनी तपासाधिकारी हेडकॉन्स्टेबल भरत ईशी, उज्वल पाटील, कैलास साळुंखे, हितेश बेहरे यांच्यावर आरोपी शोधण्याची जबाबदारी सोपवली होती. ट्रक चोरणारे दोघे जण होते. त्या कालावधीत सुमारे ३० हजार कॉल झाले होते. पोलिसांपुढे नेमके आरोपी कोण हे समजत नव्हते. पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. दोघांमधील एक कॉल तांत्रिकदृष्ट्या आढळून आला आणि हे दोघे जण मध्यप्रदेशातील असल्याचे निदर्शनास आले. हुसेन शौकत पठाण (वय २३), रमेश लक्ष्मण भिलाला (वय २०) या दोघांनी ट्रक चोरल्यापासून १०० किमी पर्यंत एकमेकाशी संपर्क केला नव्हता. त्यामुळे मध्यप्रदेशातील पोलिसांना सुगावा लागला नव्हता. मात्र महाराष्ट्रात अमळनेर परिसरात त्यांनी एकमेकांशी संवाद साधून वेगवेगळ्या दिशेने निघाले होते. तांत्रिक यंत्रणेच्या साहाय्याने डीवायएसपी सुनील नंदवाळकर यांच्या पथकाने दोघं आरोपीना अटक करून अमळनेर आणले होते. त्यांनतर मध्यप्रदेश पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले होते.