
चाणाक्ष गुन्हेगाराला अमळनेर पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर मधून केले जेरबंद…
अमळनेर:- अल्पवयीन मुलीला अमळनेर येथून पळवून नेऊन पोलिसांना माझा नाद सोडा म्हणून आव्हान देणाऱ्या शहादा येथील चाणाक्ष गुन्हेगाराला चतुर पोलिसांनी छत्रपती संभाजी नगर मधून अटक केली आहे.

शहादा येथील एक अल्पवयीन तरुणी आपल्या कुटुंबासह देवाच्या कार्यक्रमासाठी आपल्या मामाकडे अमळनेरला ताडेपुरा येथे ३० मे पासून आली होती. ३ जून रोजी गांधलीपुरा भागात देवाचा कार्यक्रम आटोपल्यावर सर्वजण सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास अचानक मुलगी गायब झाली.शोधाशोध केल्यावरही मुलगी सापडली नाही म्हणून मुलीच्या वडिलांची अमळनेर पोलीस स्टेशनला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने त्या अल्पवयीन मुलीस पळवून नेल्याची फिर्याद दिली. पोलीस स्टेशनला अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीस निरीक्षक विकास देवरे यांनी पळून गेलेल्या प्रेमी युगुलाच्या शोधासाठी हेडकॉन्स्टेबल विनोद सोनवणे, राजेंद्र देशमाने, महिला कर्मचारी मोनिका पाटील यांना पाठवले. तांत्रिक आधारावर प्रेमी युगुल छत्रपती संभाजी नगर मध्ये असल्याचे समजल्यावर पथक तेथे पोहचले. मुलीला पळवून नेणारा दीपक राजेश डामरे (वय २२ रा शहादा) हा चाणाक्ष होता. पोलीस आपला शोध घेत आहेत हे कळल्यावर त्याने त्याचा भ्रमणध्वनी बंद करून घेतला होता व पोलिसांना बंद असलेल्या नंबर वरून वायफाय वरून व्हाट्सअप कॉल करून दादा माझा नाद सोडा मी सापडणार नाही म्हणून आव्हान देत होता. सुरुवातीला प्रेमी युगुलाचे लोकेशन मिळाल्यावर एक रात्रभर पोलीस संभाजी नगरला थांबून देखील प्रेमी युगुल सापडत नव्हते. व्हाट्सअप कॉल हाच एकमेव पर्याय असल्याचे लक्षात आल्यावर हेडकॉन्स्टेबल विनोद सोनवणे यांनी देखील चतुराईने आरोपीला पकडण्याचा निर्णय घेतला. आपल्यासोबत असलेल्या महिला कॉन्स्टेबल आणि राजेंद्र देशमाने यांना नातेवाईक कुटुंब सदस्य बनून त्यांनी दवाखान्यात आल्याचे नाटक केले. स्वतःहून व्हाट्सअप कॉल करून आरोपी दीपक याला हेडकॉन्स्टेबल सोनवणे यांनी आम्ही दवाखान्यात आलो आहोत, आम्ही परेशानीमध्ये आहोत. आम्हाला काही देणे घेणे नाही. मात्र तू आमच्या सोबत फोटो काढून आम्हाला तुम्ही तुमच्या स्वतःच्या मर्जीने पळून आल्याचा जबाब दिला तर प्रकरण मिटून जाईल म्हणत त्याला बोलते केले. व्हिडीओ कॉल करून इकडे पोलिसांचे आपसातील नाटक , कौटुंबिक संवाद व एकमेकांवरील रागावणे हुबेहुब अमलात आल्याने दीपकचा विश्वास बसला. दवाखान्याच्या चक्करमध्ये पोलीस लगेच जबाब लिहून सोडतील असे वाटल्याने तो तयार झाला. मात्र भेटीची वेळ देऊनही त्याने दोन तास फिरवले. अखेरीस खुल्या मैदानात त्याने पोलिसांना भेटायला बोलावले. विनोद सोनवणे आणि मोनिका पाटील तेथे पोहचल्यावर नंतर विनोद सोनवणे यांच्या मेव्हण्यांचा रोल करणारे देशमाने पोहचले. एकमेकांशी वाद घालता घालता त्यांनी प्रेमी युगुलाला घेराव घालून लागलीच अटक केली.
मुलीच्या जबाबावरून मुलाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा नोंदविण्यात आला असून मुलीची वैद्यकीय तपासणी करून जळगाव येथील बाल सुधारगृहात रवाना करण्यात आले आहे.