
अमळनेर : मुख्यमंत्र्यांच्या १०० दिवसांच्या कार्यक्रमात अमळनेर उपविभागीय कार्यालयाने ७७.५८ गुण मिळवून जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. तर जामनेर तहसील कार्यालयाने ८४.३३ गुण मिळवून तहसील कार्यालयात जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.

मुख्यमंत्री कार्यालयाने जनसेवेसाठी काही निकष देऊन सर्व शासकीय कार्यालयाना १०० दिवसांचा कार्यक्रम आखून दिला होता. त्यात जनजीवन सुकर करणे आणि नागरिकांच्या अडचणी दूर करणे हा प्रमुख उद्देश होता. उपविभागीय अधिकारी नितीनकुमार मुंडावरे यांनी सर्व प्रथम आपल्या कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन कार्यालयाचे वेब पेज तयार केले आणि ई कार्यालय केले. त्यात ३ हजार फाईल काढल्यात. रेकॉर्ड रुमचे वर्गीकरण करून ५ हजार ८५१ फाईल अद्ययावत क्रंमवारीने लावले. तसेच त्यांचे संगणकीकरण करून घेतले. म्हणजे एखादी माहिती शोधायची असेल तर अनेक फाईल हाताळायची गरज नाही. संगणकावर माहिती टाकताच संबंधित फाईल मिळेल किंवा माहिती उपलब्ध नसल्याचेही समजेल. यामुळे फाईलचे आयुष्य वाढणार आहे.

नागरिकांचे जीवन सुकर करण्यासाठी चोपड्याच्या सुनावण्या पूर्वी अमळनेरला व्हायच्या त्या चोपड्याला होऊ लागल्या , ३६ शिवरस्ते अतिक्रमण मुक्त करून शेतकऱ्यांना दिलासा दिला. शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून नागरिकांना प्रतिक्षालाय सुविधा उपलब्ध केली. कार्यालय व परिसर सुसज्ज केले.त्यांचे सौंदर्यिकरण केले. डेड स्टोक रजिस्टर अद्ययावत केले. नवीन कर्मचार्यांना प्रशिक्षण देण्यात आले. कार्यालयात दिशादर्शक फलक लावले , यासह अंगणवाड्या भेट , प्राथमिक आरोग्य केंद्राना भेटी, क्षेत्रीय भेटी दिल्या , विप्रो रस्ता , भरवस रस्ता , कुऱ्हे रस्ता यांच्या अडचणी सोडवल्या. या साऱ्या बाबीचे मूल्यांकन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी करून त्यात अमळनेर उपविभागीय कार्यालय प्रथम आले असून विभागीय मूल्यांकनासाठी प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.


