
तीन दिवस उलटूनही पावसाच्या नोंदीत सुधारणा नाही…
अमळनेर:- महावेधच्या पावसाच्या नोंदीची त्रुटी किसान काँग्रेस व काँग्रेसच्या नेत्यांनी निदर्शनास आणून दिल्यानंतर प्रशासनाने त्याची दखल घेतली असून संबंधित विभागाचे अधिकारी महसूल मंडळात भेट देऊन पाहणी करणार असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी सी जे ठाकरे यांनी दिली.

१८ रोजी झालेल्या अतिवृष्टीबाबत महावेधच्या पावसाच्या नोंदीत मोठी तफावत आढळून आली. शेतकऱ्यांच्या शेतीतील माती, ठिबक नळ्या, बियाणे, रोपे, खते वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले. ६५ मिमी पेक्षा जास्त पाऊस झाल्यास अतिवृष्टी ग्राह्य धरली जाते. ही नोंद नुकसान भरपाई अथवा इतर शासनाकडून मिळणाऱ्या मदतीसाठी पात्र ठरते. चुकीच्या नोंदीमुळे शेकडो शेतकरी भविष्यातील मदतीपासून वंचित ठरू नये म्हणून जिल्हा किसान काँग्रेसचे अध्यक्ष सुरेश पाटील, कार्यध्यक्ष प्रा सुभाष पाटील, डॉ अनिल शिंदे, धनगर पाटील यांनी जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर, तालुका कृषी अधिकारी सी जे ठाकरे यांच्या मार्फत प्रशासनला महावेधची त्रुटी निदर्शनास आणून दिली. तीन दिवसात चुकीची नोंद अथवा उशिरा डेटा मिळाल्याने दुरुस्ती केली जाते. मात्र २१ जून पर्यंत दुरुस्ती आली नाही. कृषी अधिकारी ठाकरे यांनी तातडीने यासंदर्भात महावेधशी संपर्क साधल्याने महावेध चे अधिकारी अमळनेर तालुक्यात शिरूड, मारवड,पातोंडा मंडळांसह अमळनेर तालुक्यात भेट देणार असल्याचे कृषी अधिकारी ठाकरे यांनी सांगितले. त्याच प्रमाणे जिल्हा पीक विमा अधिकारी किरण पाटील यांनी देखील शेतकरी नेते प्रा सुभाष पाटील यांच्याशी संपर्क साधून शिरूड मंडळातील गेल्या काही दिवसांपासूनच्या पावसाची चौकशी केली.

