अक्षयचा मृतदेह पोलीस ठाण्यात आणून केले आंदोलन, शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार…
अमळनेर:- मुंबईत पोलीस भरती दरम्यान मृत्युमुखी पडलेल्या अमळनेर येथील अक्षय बिऱ्हाडेच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्या संबंधितांवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करा व पीडित कुटुंबास आर्थिक मदत द्या या मागणीसाठी समाजबांधवांनी काल सकाळी अक्षयचा मृतदेह अमळनेर तहसील कार्यालयासमोर नेऊन आंदोलन केले.
प्रबुद्ध कॉलनीतील रहिवासी असलेला अक्षय मिलिंद बिऱ्हाडे, (वय 22 वर्ष) हा तरुण मुंबईत कल्याण तालुक्यातील बेळगाव कॅम्प येथे पोलीस भरती असल्याने त्यासाठी तो गेला होता. सुरवातीला मैदानी चाचणी साठी 5 की मी धावावे लागणार असल्याने तो मैदानात उतरला आणि मोठ्या जिद्दीने धावला मात्र साडेचार किमी अंतर धावल्यानंतर केवळ 500 मीटर बाकी असताना चक्कर आल्याने अचानक तो खाली कोसळून बेशुद्ध झाल्याने त्याला तातडीने उचलून कळवा येथे हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले होते. दोन तासांनी तो शुद्धीवरही आला मात्र पुन्हा हृदयाचा जोरदार झटका आल्याने त्याची प्राणज्योत मालवली.या दुःखद घटनेने त्याच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला होता आईवडिलांचा एकुलता एक आधार गेल्याने समाजबांधव देखील हळहळले होते. वेळीच उपचार न मिळाल्याने अक्षयचा मृत्यू ही बाब समाजबांधवात पसरल्याने सर्वत्र संताप व्यक्त झाला,सदर प्रकरणी रात्रीच काहींनी पोलीस ठाण्यात धाव घेत गर्दी केली होती आणि काल सकाळी मृतदेह रुग्णवाहिकेतून मुंबई येथून येताच रुग्णवाहिका थेट तहसील कार्यालयात नेण्यात आली. जोपर्यंत संबंधीतांवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका साऱ्यांनी घेतली होती,तसेच एकुलता एक आधार गेल्याने या कुटुंबास शासनाकडून आर्थिक मदत मिळावी अशीही मागणी करण्यात आली.यावेळी पोलीस निरीक्षक विकास देवरे यांनी सर्वांची समजूत काढली तर प्रांताधिकारी बाहेरगावी असल्याने त्यांच्या वतीने धमके यांनी निवेदन स्वीकारले. समाजाच्या भावना वरिष्ठांकडे कळविण्याची हमी घेतल्यानंतर मृतदेह ताब्यात घेण्यात आला.व आंदोलन थांबविण्यात आले. त्यानंतर अत्यंत शोकाकुल वातावरणात ताडेपुरा अमरधाम येथे अक्षयवर अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी माजी आमदार शिरीष चौधरी,माजी नगराध्यक्षा जयश्री पाटील,डॉ अनिल शिंदे यासह अनेक नेते मंडळींची उपस्थिती होती.
दरम्यान आज सकाळी 11 वाजता पुन्हा समाजबांधव एकत्रित येऊन प्रांताधिकारी यांना निवेदन देणार आहेत.
मंत्री अनिल पाटील यांचे मुंबईत मदतकार्य…
सदर घटनेची माहिती मुंबईत अधिवेशनात असलेल्या मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांना मिळताच त्यांनी प्रशासनाशी संपर्क साधून आपल्या स्वीय सहायकास कळवा येथे रुग्णालयात मदतीसाठी पाठविले,तेथे आवश्यक मदतकार्यासह मृतदेह अमळनेर येथे आणण्यासाठी मोफत रुग्णवाहिकेची व्यवस्था त्यांनी करून दिली.झालेली घटना अत्यंत दुःखदायक असल्याचे त्यांनी सांगत शोक व्यक्त केला आहे.