६० दशलक्ष लिटर पाणी साठा उपलब्ध, मोठ्या प्रमाणावर भूजलपातळी वाढणार…
अमळनेर:- गाळमुक्त धरण ,गाळ युक्त शिवार अभियान धार मालपूर पाझर तलावात राबवून धरण गाळ मुक्त करत शेकडो एकर शेत जमीन गाळ युक्त झाल्याने गावकऱ्यांना मुबलक पाणी व शेतकऱ्यांना शेती पिकांना खत अवघे ५० रुपये खर्च करून रासायनिक खतांचा वापर न करता भरघोस पीक घेता येणार आहे. तसेच यातून दोन हजार ११० ब्रास गाळ काढला गेल्याने ६० दशलक्ष लिटर पाणी साठा उपलब्ध होऊन जूनच्या शेवटी समाधानकारक पावसाने तलाव तुडुंब भरल्याने १२ गावातील पाणी टंचाईवर मात करणे शक्य झाले आहे.
मारवड विकास मंचच्या मावळ्यांनी व स्थानिक ग्रामस्थांनी धार मालपूर पाझर तलावाचा आजूबाजूला असलेल्या १२ गावातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी तलावात साचलेला गाळ काढून खोलीकरण करून उपसलेला गाळ अवघ्या ५० रुपये डिझेलसाठी देऊन गाळ मुक्त धरण, गाळ युक्त शिवार अभियान स्वयंपूर्तीने राबवले सुमारे ५६ एकर अधिग्रहित क्षेत्रात विस्तारलेल्या धार- मालपूर पाझर तलावातील गाळ काढून खोलीकरणाचे काम सेवाभावी संस्था व ग्रामस्थांनी जूनच्या सुरुवातीला हाती घेतले होते.
उन्हाळ्यात तालुक्यात जवळपास ३० गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू होता. धार- मालपूर परिसरातील दहा गावांना वरदान ठरणारा हा पाझर तलाव कोरडा आहे. पावसाळ्यापूर्वी या तलावातील गाळ काढून खोलीकरण झाल्यास जलसाठ्यात मोठी वाढ होऊन दहा गावांची पाण्याची समस्या सुटेल, असे प्रा. गणेश पवार यांनी सांगितले. मारवड विकास मंच आणि परिसरातील ग्रामस्थांनी जेसीबी, डंपर, ट्रॅक्टरच्या माध्यमातून तलावातील
गाळ काढण्यास सुरुवात केली होती. नाममात्र ५० रुपयात एक ट्रॅक्टरप्रमाणे गाळ वाहून नेण्याचे शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आले होते.
२५ वर्षांपूर्वी लघुपाटबंधारे विभागाने धार-मालपूर गावातील ५५ शेतकऱ्यांचे ५६ एकर क्षेत्र अधिग्रहित करून या पाझर तलावाची निर्मिती केली. तीन नाल्यांचे पावसाळी पाणी या तलावात अडविण्यात आले आहे. १८.२५ चौरस मैल इतका जलसाठा राहण्याची या पाझर तलावाची क्षमता असून, त्याद्वारे सुमारे २५९ एकर शेतीला सिंचन व धार, मालपूर, अंतुर्ली, रंजाणे, अंबारे, खापरखेडे आदी दहा गावे टँकरमुक्त ठरली आहेत. मात्र, पावसाळा संपताच हा पाझर तलाव आटतो.
धार- मालपूर पाझर तलावात बारमाही जलसाठा राहावा, यासाठी बोरी नदीवरील फापोरे ब्रिटिशकालीन वळण बंधाराद्वारे बोरीचे पाणी तलावात सोडण्याची मागणी तलाव पुनर्भरण समितीने केली आहे.
प्रतिक्रिया…
तापी खोरे विकास महामंडळाने या पाझर तलाव पुनर्भरणसाठी सुमारे एक कोटी खर्चाचे अंदाजपत्रक चार वर्षांपूर्वीच जलसंपदा विभागाला सादर केले आहे. परंतु, प्रशासकीय मान्यतेअभावी प्रस्ताव रखडलेला आहे. निवडणूक आचारसंहिता संपताच प्रशासकीय मान्यतेसाठी दहा गावातील संघर्ष करतील असे सचिन बाळू पाटील व प्रा. गणेश पवार यांनी सांगितले.