अमळनेर:- तालुक्यातील पाडसे येथील मुलांच्या खेळण्याच्या भांडणातून वाद झाल्याने आधी दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात होता. आता दुसऱ्या गटातर्फे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी गौतम गव्हाणे याच्या फिर्यादीनुसार गावात परिवारासह राहणारी त्याची आत्या मीराबाई आधार शिरसाठ ही लहान मुलांच्या वादातून फिर्यादीच्या पत्नीला शिवीगाळ करत होती. दि. २२ फेब्रू. रोजी फिर्यादी ने त्याचा आत्यास जाब विचारला असता दुसरी आत्या लीलाबाई सैंदाणे, आत्याचा नवरा आधार शिरसाठ, आतेभाऊ प्रदीप शिरसाठ हे आले. त्यावेळी त्यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली तसेच प्रदीप याने लोखंडी सुऱ्याने वार केल्याने फिर्यादीच्या डोक्यातून रक्त येवू लागले तसेच काठीनेही मारहाण केली. फिर्यादीच्या पुतण्याने त्यांची सोडवणूक केली. उपचारासाठी अमळनेर ग्रामीण रुग्णालयातून डॉक्टरांच्या सल्ल्याने धुळे येथे उपचारासाठी दाखल केले होते. त्यामुळे फिर्याद दाखल करण्यात उशीर झाला असून वरील चार जणांविरुद्ध मारवड पोलिसात भादवि कलम ३२३,३२४, ५०४, ५०६ अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पो ना सचिन निकम हे करीत आहेत.