तिरंगा चौकात मंत्र्यांच्या हस्ते शिलाफलकाचे होणार अनावरण…
अमळनेर:- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या सांगता प्रसंगी अमळनेर शहर सुशोभीकरण व तिरंगी रोषणाईने नटले असून आज तिरंगा चौकात मंत्र्यांच्या हस्ते शिलाफलकाचे अनावरण होणार आहे.
मेरी मिट्टी मेरा देश या अभियांनातर्गत शहरात माजी सैनिक, स्वातंत्र्य सैनिक यांचा सन्मान करण्यासोबत विविध ठिकाणी सुशोभीकरण करण्यात आले आहे. चोपडा धुळे रस्त्यावर तिरंगा चौकात १०५ फुटी तिरंगा डौलाने फडकत आहे. त्याच्याच खाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अभिवादन करणारा संदेश असलेले शिलाफलक उभारण्यात आले आहे. शहरातील मुख्य रस्त्यावर मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांच्या संकल्पनेतून पथदिव्यांच्या खांबांना भारताच्या तिरंगा झेंड्याच्या रंगाप्रमाणे केशरी, पांढरा, हिरवा अशी लायटिंग लावण्यात आली आहे. यामुळे शहराच्या सौंदर्यात तर भर पडली आहे. त्यासोबत प्रत्येकाच्या मनात देशभक्ती उफाळून येत आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाला निरोप देण्यासाठी प्रत्येक प्रभागातून माती गोळा करून तिचा कलश बनवून जिल्ह्यावर रवाना करण्यात येणार आहे. तसेच हा कलश दिल्ली येथे पाठवण्यात येणार आहे. १३ रोजी विविध शासकीय कार्यालयात ध्वजारोहण करण्यात आले. वीरांना, देशासाठी बलिदान देणाऱ्या सैनिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. विविध शासकीय कार्यालयातील उपक्रम पाहता शहरात अनेक ठिकाणी देशभक्ती गीतांचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. १४ रोजी सकाळी १० वाजता तिरंगा चौकात मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते शिला फलकचे अनावरण करण्यात येणार आहे. त्याच प्रमाणे सैनिक व माजी सैनिक तसेच कुटुंबीयांचा सत्कार करण्यात येणार आहे.