अमळनेर:- तालुक्यातील मारवड येथील कै. न्हानाभाऊ म. तु. पाटील कला महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने, “आंतरराष्ट्रीय महिला दिन” साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. दिलीप कदम यांनी तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत देसले यांनी भुषविले. या कार्यक्रमप्रसंगी व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ वसंत देसले, क. ब.चौ. उमवि, जळगावच्या विद्यार्थी विकास विभागाचे जिल्हा समन्वयक प्रा. डॉ. पवन पाटील व रासेयो महिला कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. नंदा कंधारे, महाविद्यालयातील वरीष्ठ लिपिक श्रीमती मंजुषा गरुड, संरक्षणशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. जितेंद्र माळी हे होते. सदर कार्यक्रमाच्या सुरुवातीस राजमाता जिजाऊंच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. तद्नंतर उपस्थितांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉ. पवन पाटील यांनी आपल्या व्याख्यानातून महिलांनी विविध क्षेत्रात केलेल्या अतुलनीय कामगिरीचे वर्णन केले. तर डॉ. नंदा कंधारे यांनी आपल्या व्याख्यानात प्रस्थापित समाज रचना व महीलांची स्थिती यावर भाष्य केले. तसेच आजची महिला अबला नसून सबला असून ती आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वच क्षेत्रात नवनवीन विक्रम करीत आहे, असल्याचे नमूद केले. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. वसंत देसले यांनी प्राचीन, मध्ययुगीन व आधुनिक काळातील महीलांची समाजातील स्थिती, महिलांना सहन कराव्या लागलेल्या विविध समस्या, प्रश्न, तडजोडी याबाबत सखोल अशी माहिती दिली. तसेच उपस्थित विद्यार्थीनींना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. डॉ. जितेंद्र माळी यांनी केले तर कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सहकार्य केले.