
अमळनेर : तालुक्यातील झाडी येथे सरपंच आणि ग्रामसेवक बेपत्ता असून पाणी पुरवठा कर्मचाऱ्यांना पगार नाही. त्यामुळे गावाला पिण्याचे पाणीच मिळत नाही म्हणून संतप्त गावकऱ्यांनी पंचायत समिती वर मोर्चा काढला. पाणी पुरवठा योजनाच बंद करण्याची मागणी करण्यात आली आहे.

तालुक्यातील झाडी येथे भारत निर्माण योजना ,जलजीवन मिशन योजना ,ग्रामपंचायत पाणी पुरवठा योजना अशा तीन तीन योजना राबवून देखील गावाला पाणी मिळत नाही. सरपंच बेपत्ता आहे तर ग्रामसेवक येत नाही. त्यामुळे पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांचा पगार निघत नाही. पाणी पुरवठा कर्मचारी वाट्टेल तेव्हा पाणी सोडतात किंवा सोडत नाहीत. आर ओ खाजगी चालवतात. त्यामुळे गावातील वृद्ध ,शेतकरी ,मजूर याना पाण्यासाठी वणवण ,भटकंती करावी लागते. याबाबत ग्रामपंचायत सदस्यांना सांगितले तर ते म्हणतात सरपंच व ग्रामसेवक ऐकत नाहीत. असाच अनागोंदी कारभार चालू राहिल्यास पाणी पुरवठा योजनांचा उपयोग नाही म्हणून आम्ही गावकरीच या पाणी पुरवठा योजनेवर बहिष्कार टाकत आहोत अशा आशयाचे निवेदन गावकऱ्यांनी गटविकास अधिकारी एन आर पाटील यांना दिले आहे. निवेदनाच्या प्रति उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार याना देण्यात आल्या आहेत. निवेदनावर निंबा लोटन पाटील ,पंकज अशोक पाटील , राहुल दामोदर पाटील , व्यंकट आनंदा पाटील , नितीन अशोक पाटील ,हर्षल शिवाजी पाटील , राकेश अशोक पाटील ,वसंत चंदन भारती आदींच्या सह्या आहेत.

