
रात्रीच्या वेळी फिरणारे तीन संशयित इसम चोरीची गाडी सोडून पळाले…
अमळनेर:- तालुक्यातील इंदापिंप्री गावातील ग्रामरक्षक दलातील तरुणांनी रात्रीच्या वेळी फिरणाऱ्या तीन जणांना विचारपूस केल्याने त्यांनी गाडी सोडून पळ काढला. दरम्यान ही गाडी ही चोरीची निघाल्याने पो. नि. हिरे यांनी ग्रामरक्षक तरुणांचा सत्कार केला आहे.
अमळनेर पोलीस ठाणे हद्दीत गावागावात ग्राम संरक्षक पथक स्थापन करण्यात आले आहे. दि.१४ मार्च रोजी इंदापिंप्री गावात जानवे रोड काढून रात्री ०१.०० वाजेच्या सुमारास गावात अनोळखी तीन इसम पल्सर गाडीवर संशयित रित्या जातांना दिसले. त्यांची ग्राम संरक्षक पथकाच्या चारही तरूणांनी सखोल विचारपुस केली असता त्यांनी उडवा उडवीची उत्तर दिली. त्यावरून त्यांच्याशी बोलताना एकाने त्यांचे फोटो काढलेत व पोलिसांना कॉल केला. पोलीस येणार हे समजताच सदरचे तिन्ही संशयीत मोटार सायकल सोडून जंगलाच्या दिशेने पळून गेले. सदरची गाडीची चौकशी केली असता बोदवड गावातून चोरी असून बोदवड पोलीस स्टेशनला गाडी चोरीचा गुन्हा दाखल असल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून काल इंदापिंप्री गावात पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी स्वतः जाऊन चारही ग्राम संरक्षक सदस्यांचा सत्कार केला व शुभेच्छा देवून रात्री गस्त करतांना कशा प्रकारे संशयीतांची विचारपुस करावी याबाबत मार्गदर्शन केले.




