नवभारत माध्यमिक विद्यालय दहिवद येथे डी ए धनगर यांचे प्रतिपादन..
अमळनेर:- सध्या अनेक शाळकरी मुलांना मोबाईलचे व्यसन लागलेले आहे. ऑनलाइन डिजिटल गेमिंग मुळे विद्यार्थ्यांना त्याचे विशेष कौतुक वाटत आहे, त्यामुळे मुलांच्या मानसिक, शारीरिक, बौद्धिक व भावनिक जीवनावर भयंकर परिणाम होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना चिंता तणाव नैराश्य या गंभीर गोष्टींना सामोरे जावे लागत आहे असे प्रतिपादन डी ए धनगर यांनी दहिवद येथील नवभारत माध्यमिक विद्यालयात मुलांना मोबाईलचे दुष्परिणाम या विषयावर मार्गदर्शन करताना केले.
मोबाईलच्या अतिवापरामुळे मुलांना मानेची समस्या, डोळ्यांची समस्या, हातांची व्यथा व शारीरिक समस्या येऊ शकतात. नको त्या वयात नको ते पाहून मुलांमध्ये नकारात्मकता निर्माण होते. तसेच मोबाईलच्या अतिरेकी वापरामुळे सामाजिक संबंधांमध्ये दुरावा निर्माण होऊ शकतो. शिक्षणात अर्थ लागत नसल्यामुळे गुणांवर परिणाम होऊ शकतो असे एकूणच सर्वांगीण विकासावर अर्थात व्यक्तिमत्त्वावर त्याचा परिणाम दिसायला लागला आहे. मोबाईल आपल्याला कसा आकर्षित करतो याची शास्त्रोक्त माहिती यावेळी धनगर यांनी दिली. आनंदाची भूक भागवणारे डिजिटल गॅझेट यांचा अतिरेकी वापर केला तर आपण व्यसनात कसे ओढले जातो हे आपल्यालाही कळत नाही. त्यामुळे मुलांनी त्यापासून सावध राहिले पाहिजे व मोबाईलचा मर्यादित वापर केला पाहिजे. मोबाईल मुळे डोळ्यांना ताण आणि दृष्टी समस्या निर्माण होऊ शकते, निद्रानाश आणि झोपेची समस्या, डिजिटल एक्सपोजरचा धोका, सज्ञानात्मक विकासावर नकारात्मक प्रभाव, संप्रेषण क्षमता मर्यादा, खराब शैक्षणिक कामगिरी, अभ्यासावर कमी फोकस, सायबर गुंडगिरी आणि ऑनलाइन शिकारींचा वाढलेला धोका, शारीरिक आरोग्य समस्या व बैठी जीवनशैली यावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
त्यावर उपाय म्हणून शंभर टक्के मुलांच्या शंभर टक्के क्षमता विकसित करण्यासाठी व मुलांना जागतिक स्वीकार्यता मिळवण्यासाठी मुलांनी चिकित्सक विचार, सर्जनशीलता, सहयोग, संवाद , आत्मविश्वास, करुणा आदी कौशल्य स्वतः विकसित केले पाहिजे. विद्यार्थ्यांनी डिजिटल उपवास अथवा डिजिटल संन्यास काही काळासाठी घेतला पाहिजे. त्यामुळे डिजिटल डिटॉक्स होऊन या व्यसनापासून आपण वाचू शकतो. पालकांनी मुलांना वेळ दिला पाहिजे ज्यामुळे मुले मोबाईल पासून लांब राहतील व त्यांना आपल्याविषयी आस्था निर्माण होईल. तसेच मुलांना मोबाईल पासून होणारे दुष्परिणाम यासाठीची माहिती दृश्य स्वरूपात दाखवली पाहिजे. तसेच मुलांनी स्वयंप्रेरणेने आपले रिवार्ड टेक्निक अवलंब केला पाहिजे. आभासी जगामध्ये वावरण्यापेक्षा वास्तव जगाचा आनंद घेतला पाहिजे. व आपल्या शालेय क्षमता अर्थात सर्वांगीण विकास करून घेतला पाहिजे.कार्यक्रमाला संस्थाध्यक्ष जयवंतराव पाटील व सर्व कार्यकारी संचालकांनी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक ए. डी. सैंदाणे हे होते तर सूत्रसंचालन सुशील भदाणे यांनी केली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी एस बी पाटील जेष्ठ शिक्षिका श्रीमती वैद्य मॅडम जेष्ठ शिक्षक ढिवरे सर, शेलकर सर, घोरपडे सर, एस. आर. पाटील, निकम सर, के. आर. पाटील सर, बाविस्कर सर, मोरे सर, परदेशी मॅडम, ए. आर. पाटील सर यांनी परिश्रम घेतले.
.