शहरातील संत प्रसाद नगरातील घटना, ठेकेदाराचे दुर्लक्ष…
अमळनेर:- गटारीच्या कामासाठी खोदून ठेवण्यात आलेले खड्डे पावसाने तुडुंब भरून त्यात दोन लहान मुले बुडाली. मात्र आठवीच्या मुलाने खड्डयात उडी मारून त्यांना वेळीच बाहेर काढल्याने दोघांचे प्राण वाचले.
संत प्रसाद नगर मध्ये गटारीचे काम सुरू असून कंत्राटदाराने सुमारे पाच फूट खोल खड्डे करून ठेवले आहेत. या परिसरात पाण्याचा निचरा होत नाही. त्यात जोरदार पावसाने हजेरी लावल्याने खोदून ठेवलेले खड्डे पाण्याने पूर्ण भरले होते. शुक्रवारी संस्कार आशिष पारध्ये (वय ६) आणि वेदांत आशिष पारध्ये (वय ३) हे दोघे दुकानावर वस्तू घ्यायला बाहेर निघाले. त्यात एकाचा काठावर पाय घसरल्याने तो खड्डयात पडला दुसरा त्याला धरायला गेला असता तोही पाण्यात पडला आणि बुडाला. खाली माती होती त्यामुळे ते गाळात फसले. मात्र ही घटना राज गणेश महाजन (वय १३) या आठवीतील मुलाने पाहिली होती त्यामुळे त्याने पटकन पाण्यात उडी मारली. दोघांना बाहेर काढले तेव्हा त्यांच्या नाका तोंडात पाणी जाऊन जीव गुदमरला होता. आणखी थोडा वेळ गेला असता तर अनर्थ घडला असता. घटनेमुळे परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला. ठेकेदारावर राग व्यक्त करण्यात आला. अखेर ठेकेदाराने रात्रीच्या रात्री साचलेल्या पाण्याचा निचरा केला. राजने केलेल्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.