
अमळनेर : नाफेड अंतर्गत उडीद ,मूग आणि सोयाबीन धान्याच्या खरेदीसाठी जिल्ह्यातील अमळनेर शेतकी संघाला डावलून अमळनेर साठी एरंडोल शेतकी संघाला नेमण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. जिल्ह्यातील १४ केंद्रावर १० ऑक्टोबर पासून प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.
अमळनेर तालुक्यातील उडीद, मूग ,सोयाबीन खरेदीसाठी प्रभारी जिल्हा पणन अधिकारी एस एस मेने यांनी १ ऑक्टोबर रोजी कै अण्णासाहेब मुरलीधर गंगाराम पाटील फळ व भाजीपाला खरेदी व विक्री सोसायटी चांदसर यांच्या नावाचे आदेश जारी केले होते. मात्र लगेचच ३ ऑक्टोबर रोजी काढलेल्या आदेशात अमळनेरची खरेदी एरंडोल शेतकी संघाला देण्यात आली. खरेदीसाठी ऑनलाइन नाव नोंदणी मार्केट यार्ड अमळनेर येथील कृषी उत्पन बाजार समितीच्या कार्यालया जवळ सुरु करण्यात आली आहे.
नाव नोंदणीचे आवाहन एरंडोल तालुका शेतकरी सहकारी संघातर्फे करण्यात आले आहे.अमळनेर तालुक्याचे खरेदीचे काम एरंडाल शेतकी संघ करणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी आधार कार्ड , बॅक पासबुक झेरॉक्स व चालू वर्षाचा सन २०२४/२५खरीप चा ऑनलाइन मुग , उडीद व सोयाबीन नोंदणी केलेला सातबारा उतारा . ही कागदपत्रे ऑनलाइन नोंदणी करीता दि. ५ ऑक्टोबर २०२४ पासुन अमळनेर येथील कृषी उत्पन बाजार समितीच्या कार्यालया जवळ, (एरंडोल शेतकी संघाचे कर्मचारी सुभाष नामदेव पाटील. ग्रेडर रा.अमळनेर ) यांच्या जवळ जमा करावीत. या वर्षी हमी भाव मुग रु. ८६८२/-, उडीद रू. ७४००/ – , सोयाबीन रू. ४८९२/ – एवढा आहे व सदर मालाची खरेदी डी.एम.ओ.गोडाऊन अमळनेर येथील गोदामात करण्यात येईल. सदर योजनेचा लाभ शेकऱ्यांनी घ्यावा असे आवाहन एरंडोल तालुका शेतकरी सहकारी संघाचे अध्यक्ष व उपाध्यक्ष, संचालक मंडळ व मॅनेजर यांनी केलेले आहे.
अमळनेर शेतकी संघ खरेदी विक्री साठी सक्षम असून सुद्धा स्थानिक केंद्र का डावलण्यात आले? याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. याबाबत शेतकी संघाचे व्यवस्थापक संजय पाटील यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, अमळनेर शेतकी संघ काळ्या यादीत नाही तरी का वगळण्यात आले याबाबत आश्चर्य वाटत आहे. मंत्री अनिल पाटील व खासदार स्मिता वाघ याना याबाबत दखल घ्यायला सांगितले आहे.

