
मका आणि कापसाचे नुकसान, खरीप हंगाम गेला वाया…
अमळनेर:- तालुक्यातील कळमसरे, मारवड, गोवर्धन, वासरे, खेडी, पाडळसरे, निम, तांदळी, शहापूर, आदि गावांमध्ये शुक्रवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. यात शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे.
या पावसामुळे वेचणीवर आलेल्या कापसाची वाताहत झाली, तर मक्याचे देखील नुकसान झाले आहे. काही शेतकऱ्यांनी मका काढला, तर काहींचा शेतातच पडून आहे यामुळे सर्वत्र पाणी साचले. तोंडी आलेला घास हिरावला. शेतकऱ्यांचा तोंडी आलेला घास अखेर हिरावला जात आहे. अचानक झालेल्या पावसाने दुसऱ्यांदा तोंडी आलेला घास हिरावला गेला. मारवड मंडळात पावसाची जोरदार हजेरी लावल्याने पिकांचे अतोनात नुकसान झाले. खरीप पिकांची काढणी सुरु असतानाच पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ऑक्टोबर महिना तिसरा टप्पा आला असतानाही पाऊस सुरुच असल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. यात कापलेल्या मक्याचे चाऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच इतर पिकांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पिकांचे दाणे खाली पडून कोंब फुटण्याची शक्यता आहे. तसेच डागी होऊन काळा पडेल, त्याचप्रमाणे बाजरी व मक्याचे पीक जेमतेम उभे राहिले असताना मजुरांअभावी त्यावर पाणी पडल्याने तोटे कणसे खराब झाली. मका पडलेला असताना कणसांचे नुकसान होणार असल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.

