अमळनेर:- पाण्याच्या टाकीत पडून विवाहितेचा मृत्यू झाल्याची घटना मराठा मंगल कार्यालयाजवळ २० रोजी सकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली.
जयश्री सुनील चौधरी (वय ४३ रा. मराठा मंगल कार्यालयाजवळ) या २० रोजी सकाळी पाच वाजता नळाला पाणी आले म्हणून अंडर ग्राउंड पाण्याच्या टाकीत पाणी पातळी पाहायला गेल्या. बराच वेळ त्या परत आल्या नाहीत म्हणून त्यांचे पती सुनील चौधरी यांनी मुलगी कल्याणी हिला पाहायला पाठवले. मात्र जयश्री चौधरी दिसून आल्या नाहीत म्हणून सुनील चौधरी बाहेर शोधायला निघाले. त्यावेळी टाकीचे झाकण उघडे दिसले म्हणून मुलगी कल्याणी हिने टाकीत डोकावून पाहिले असता जयश्री पाण्यात बुडालेल्या दिसल्या. काही लोकांच्या मदतीने त्यांना बाहेर काढून दवाखान्यात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. अमळनेर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस पुढील तपास करीत आहेत. जयश्री चौधरी यांच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी असा परिवार असून त्या सुनील चौधरी यांच्या धर्मपत्नी होत.