अमळनेर : प्लॉट वरून चुलत भावकीत वाद होऊन विधवा महिलेचा विनयभंग तर तिच्या मुलाला चाकू मारल्याची घटना तालुक्यातील खडके येथे ३१ रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली. मुलगा दवाखान्यातून उपचार घेऊन आल्यावर उशिराने पाच जणांविरुद्ध विनयभंग, मारहाण , दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खडके येथील विधवा महिलेने फिर्याद दिली की ३१ रोजी दुपारी ३ वाजता चुलत पुतण्या समाधान नानाभाऊ बाम्हणे याच्याशी प्लॉट वरून भांडण झाले. त्यावेळी त्याने हातात लाकडी दांडका घेऊन मुलगा सिद्धार्थ याला मारहाण केली. महिला भांडण सोडवायला गेली असता तिलाही चापटांनी मारहाण केली. तेव्हढ्यात समाधान याचे नातेवाईक अमर सोनवणे रा मोहाडी धुळे याने हातातील चाकूने सिद्धार्थ याच्या बरगडीवर वार केला. चुलत जेठ इंदल राजाराम बाम्हणे याने महिलेला हातातील काठीने मारहाण केली तर विद्या समाधान बाम्हणे आणि अनिता अमर सोनवणे रा मोहाडी यांनी शिवीगाळ करत मारहाण केली आणि मारहाण केली. तेव्हा इंदल आणि समाधान यांनी महिलेशी असभ्य वर्तन करत साडी ओढून तिला विवस्त्र केले. विंदया व अनिता यांनी गळ्यातील पोत ओढून नुकसान केले. हे भांडण पाहून गावातील लोक तुम्हाला नियमाप्रमाणे प्लॉट मिळेल असे सांगून भांडण आवरायला आले असता मारहाण करणार्यांनी तुम्ही भांडणात पडू नका नाहीतर तुमच्यावर केस करेल अशी धमकी दिल्याने गावातील लोक निघून गेले. त्यांनंतर महिला व मुलगा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करायला आले असता पोलिसांनी मेडिकल मेमो देऊन ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी पाठवले. ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार झाल्यानन्तर जखमीला धुळे नेण्यास सांगीतले. धुळ्याला नेताना त्रास होऊ लागल्याने अमळनेर येथे नर्मदा मेडिकल फौंडेशन मध्ये उपचारासाठी नेण्यात आले. तेथेही आरोपीनी तुम्ही जर तक्रार दिली तर तुम्हाला गावात राहू देणार नाही अशी धमकी दिली. उपचार घेतल्यानन्तर महिलेने फिर्याद दिल्यावरून अमळनेर पोलिस स्टेशनला पाचही जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेडकॉन्स्टेबल कैलास शिंदे करीत आहेत.