अमळनेर:- सहा महिन्यांपासून गणवेश नसल्याने जिल्हा परिषद प्राथमिक शाळांची मुले दुसऱ्या गणवेशाच्या प्रतीक्षेत आहेत. गणवेश शिवून तयार असताना निव्वळ शिलाई रक्कम मिळत नाही म्हणून मुलांना गणवेश मिळण्यास विलंब होत आहे.
जिल्हा परिषदांच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शासनातर्फे दोन गणवेश आणि बूट मोफत दिले जातात. गेल्या वर्षीपर्यंत शासन शाळांना पैसे देऊन त्यांना गणवेश घ्यायला सांगत असल्याने शाळांना स्वातंत्र्य होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना वेळेवर गणवेश मिळत होता. यावर्षी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण परिषदेतर्फे पहिल्या गणवेशासाठी कापड पाठवून शाळांना स्वातंत्र्य दिले होते. शाळांनी गणवेश शिवून मुलांना वाटले. दुसरा गणवेश स्काऊट चा देणार असल्याने कापड वरूनच पाठवण्यात आले. बचत गटांच्या मार्फत ते शिवून मुलांना वाटप करायचे होते. बचत गटांनी ते शिवून ठेवले आहेत. परंतु शिक्षण परिषदेतर्फे पैसेच मिळाले नसल्याने बचत गट गणवेश देत नाहीत. म्हणून नोव्हेंबर महिना उजाडला तरी मुलांना दुसरा गणवेश मिळालेला नाही.
प्रतिक्रिया…
अमळनेर तालुक्यात जिल्हा परिषद प्राथमिक शाळांचे ४ हजार४७५ मुले आणि ४ हजार ३५३ मुली असे एकूण ८ हजार ८२८ विद्यार्थी आहेत. त्यांना गणवेश मिळावेत यासाठी शिवणकाम लवकर सुरू होण्यासाठी स्वतः आगाऊ रक्कम दिली आहे. मात्र बचत गटांना पूर्ण रक्कम मिळत नाही तोपर्यंत गणवेश ताब्यात मिळणार नाहीत.- रावसाहेब पाटील , गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती अमळनेर
प्रतिक्रिया…
दोन महिन्यांपासून गणवेश शिवून पूर्ण झाले आहेत. मात्र शिक्षण परिषदेतर्फे अद्याप एक रुपया देखील मिळालेला नाही. गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील यांनी कामासाठी आगाऊ रक्कम दिली होती.शिलाई कामगारांना पगार द्यायला देखील पैसे नाहीत. अमळनेर तालुक्याची सुमारे आठ लाख रुपये बाकी आहे.- महेंद्र अवचारे ,संचालक माही गारमेंट ,अमळनेर
प्रतिक्रिया…
दुसरा गणवेश स्काऊट चा आहे. राष्ट्रीय सणाकरता गणवेश आवश्यक असल्याने तो किमान २६ जानेवारीपर्यंत मिळणे अपेक्षीत आहे. – किरण शिसोदे ,केंद्रप्रमुख
प्रतिक्रिया…
वर्ष उलटत आले तरी जर विद्यार्थ्यांना गणवेश मिळत नसेल तर शिक्षण परिषदेचे शिक्षणाकडे आणि बालकांचा मोफत शिक्षणाचा हक्क आणि कायदा याकडे दुर्लक्ष होत असल्याचे जाणवते.- अमोल पाटील ,पालक