अमळनेर : तालुक्यातील मंगरूळ येथील शिरूड रस्त्यावर सुमारे १२ गाळ्यातून ४० हजार रुपये किमतीच्या विद्युत तारा चोरीस गेल्या तर ट्रॅक्टरने धडक दिल्याने पाच सिमेंट पोल व तारा तुटून ४० हजार असे एकूण ८० हजार रुपयांचे नुकसान झाल्याची घटना ४ व ६ डिसेंबर रोजी घडल्या आहेत.
४ रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास सुनील रतन महाजन यांच्या मालकीच्या ट्रॅक्टर क्रमांक एम एच १९ सी बी ९१९६ ने एमआयडीसी भागात तीन सिमेंट पोलला धडक दिल्याने पाच पोल व दोन स्टे तुटून सुमारे ४० हजार रुपयांचे नुकसान झाल्याची घटना घडली. सहाययक अभियंता विजय माळी यांनी फिर्याद दिल्यावरून अमळनेर पोलीस स्टेशनला अज्ञात चालकविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम २८१,३२४(४) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तर ६ रोजी शिरूड रस्त्यावरील एमआयडीसीत शिवारात स्वप्नील प्रकाश पाटील व जयेश अरविंद पाटील या दोन्ही ग्राहकांच्या बंद कनेक्शन साठी असलेल्या प्रत्येकी सहा सहा गाळ्यातील २०० केव्हीच्या ४० हजार रुपये किमतीच्या अल्युमिनियमच्या विद्युतवाहक तारा चोरून नेल्याचे उघडकीस आले. अभियंता विजय माळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस स्टेशनला भारतीय न्याय संहिता कलम १३६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही गुन्ह्यांचा तपास हेडकॉन्स्टेबल कैलास शिंदे करीत आहेत.