बाहेरगावाहून येतात बिना पावतीचे अवजड बेकायदेशीर डंपर…
अमळनेर : तालुक्यातील पातोंडा येथे अवैध वाळू वाहतूक करणारे दोन अज्ञात ट्रॅक्टरवर वाळू चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान शिरपूर तालुक्यातून बिना पावतीची बेकायदेशीर वाळू अमळनेर तालुक्यात बिनधास्त आणली जात असल्याने शासनाचा महसूल बुडत आहे.
तालुक्यातील पातोंडा येथे १८ रोजी रात्री अवैध वाळू वाहतूक होणार असल्याची माहिती तहसीलदार रुपेशकुमार सुराणा याना मिळताच तलाठी प्रकाश महाजन,अमोल पाटील,अमोल चक्रे, पवन शिंगारे, अमोल गिरी यांना पातोंडा येथे कारवाईसाठी पाठवले. रात्री साडे नऊ वाजता त्यांना वाळूने भरलेले दोन ट्रॅक्टर जाताना दिसले तलाठ्यांनी त्यांचा पाठलाग केला मात्र दोन्ही चालक पळून वेगाने रस्त्यात वाळू टाकून निघून गेले. तहसीलदारांच्या आदेशाने वाळूचा पंचनामा करण्यात येऊन प्रकाश महाजन यांच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीसात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हेडकॉन्स्टेबल विजय भोई करीत आहेत.
दरम्यान रात्री वाळू वाहतुकीला परवानगी नसताना देखील अमळनेर तालुक्यात शिरपूर येथून अवैध वाळू वाहतूक होतेय. काही पावती असलेले तर काही पावती नसलेले व मर्यादेपेक्षा जास्त वाळू भरलेले डंपर येतात. काहींच्या पावत्याही बनावट असल्याचे समजते. शासनाचा महसूल तर बुडवला जातोय मात्र नागरिकांना निद्रानाशाचा त्रास होत आहे. मर्यादेपेक्षा अवजड वाहनांमुळे रस्तेही खराब होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
तसेच बोरी नदीतून देखील ट्रॅक्टर व टेम्पोच्या साहाय्याने अवैधरित्या मोठ्या प्रमाणात वाळू उपसा केली जात आहे. मध्यरात्री व भल्या पहाटे वेगात ट्रॅक्टर आणि टेम्पो सुरू असल्याने मोठे आवाज होतात. त्यामुळे महसूल प्रशासन आणि पोलिस प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन उचित कारवाई करावी अशी मागणी होत आहे.