अमळनेर – येथील खान्देश शिक्षण मंडळ संचलित प्रताप स्वायत्त महाविद्यालयाच्या संरक्षण व सामरिकशास्त्र विभाग आणि वनस्पतीशास्त्र विभागाची एक दिवसीय शैक्षणिक सहल अंतर्गत प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी नाशिक येथील भोसला मिलिटरी कॉलेज येथे आयोजित राज्यातील सर्वात मोठे शस्त्र प्रदर्शनास दि. 15 डिसेंबर रोजी भेट दिली. त्याचप्रमाणे त्र्यंबकेश्वर येथे वनस्पतींचे नमुने संकलन करण्यासाठी भेट दिली.
प्रताप महाविद्यालय अमळनेर येथील संरक्षण आणि सामजीकशास्त्र विभाग व वनस्पतीशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी व प्राध्यापकांनी रुसा उपक्रमा अंतर्गत शैक्षणिक सहलीसाठी नाशिक येथील भोसला मिलिटरी कॉलेज येथे आयोजित खुल्या आर्टिलरी इक्विपमेंट डिस्प्ले (शस्त्र प्रदर्शन) भेटी दरम्यान भारतीय सशस्त्र दलांद्वारे वापरल्या जाणाऱ्या महत्त्वपूर्ण अशा विविध तोफांचा व इतर शस्त्रांचा परिचय करून घेतला. बोफोर्स सारख्या तोफांचे सुद्धा प्रात्यक्षिके विद्यार्थ्यांना दाखविण्यात आली. सैन्य दलातील अधिकाऱ्यांनी तोफ आणि इतर शस्त्रांची अद्यावत माहिती यावेळेस विद्यार्थ्यांना करून दिली. त्याचप्रमाणे भोसला महाविद्यालयाच्या संरक्षण व सामरिकशास्त्र विभागाला सुद्धा विद्यार्थी व प्राध्यापकांनी भेट दिली. यावेळेस विभाग प्रमुख डॉ. रमेश राऊत यांनी त्यांचे स्वागत केले व आपल्या विभागात सुरू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. याप्रसंगी भोसला मिलिटरी कॉलेजचे प्राचार्य डॉ. दिनेश नाईक तसेच सीडीसी चेअरमन सीए श्री. प्रकाश पाठक यांनी ही प्रताप महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची व प्राध्यापकांची भेट घेतली.
शस्त्र प्रदर्शन भेटीनंतर संघ त्र्यंबकेश्वर येथे पोहोचला. संरक्षणशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांनी यावेळेस त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिराची सुरक्षा व्यवस्थेचं निरीक्षण केले व वनस्पतीशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांद्वारे तेथील जंगलातील महत्त्वपूर्ण अशा अनेक वनस्पतींचे नमुन्यांचे संकलन केले. विभाग प्रमुख प्रा. जयेश साळवे यांनी विद्यार्थ्यांना विविध वनस्पतींची माहिती सांगितली.
या एकदिवसीय शैक्षणिक सहलीस महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण जैन व अंतर्गत गुणवत्ता अभिवाचक कक्ष आणि रूसा समन्वयक डॉ. मुकेश भोळे यांनी मार्गदर्शन केले तसेच सर्व उपप्राचार्य, कुलसचिव, लेखापाल आदींचे सहकार्य लाभले. सहलीच्या यशस्वीतेसाठी संरक्षण व सामरिकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. रवींद्र मराठे, प्रा. विकास मोरे, प्रा. उषा मोरे तसेच वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख प्रा. जयेश साळवे,श्री. संदीप बिऱ्हाडे व रेहान मुजावर यांनी परिश्रम घेतले.