
मारवड पोलिसांत परस्परांविरुद्ध गुन्हे दाखल…
अमळनेर:- तालुक्यातील तरवाडे येथे विहिरीवरून शेतात पाणी भरण्याचा वादातून दोन कुटुंबात हाणामारी होऊन एकमेकांना मारहाण केल्याची घटना असून एकमेकांविरुद्ध मारवड पोलीसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
प्रथम फिर्यादी मनोहर श्रीराम पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ६ रोजी सकाळी शेतात गेले असता सतीलाल पाटील यांना विहिरीतून पाणी का भरतो आहे असा जाब विचारला असता हातातील इलेक्ट्रिक तार समोर धरून शॉक देवून मारून टाकेल अशी धमकी दिली. मोटार दगडाने फोडून स्टार्टर विहिरीत फेकून दिले. तसेच फिर्यादीची मुलगी गायत्री हिला दगडाने कमरेवर आणि डाव्या हातावर मारले. तसेच त्याची पत्नी अनिता सतीलाल व मुलगी करिश्मा सतीलाल पाटील यांनी फिर्यादी व त्यांच्या मुलीला शिवीगाळ केली म्हणून पोलीसात भादवि कलम ५०४, ५०६, ३२४, ४२७ अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
दुसऱ्या फिर्यादी नुसार सतीलाल पाटील हे विहिरीतून पाणी भरत असताना मनोहर पाटील याने आज तुझी पाणी भरण्याची पाळी नाही असे म्हणत भांडण करत त्याची पत्नी रत्नाबाई व मुलगी गायत्री आल्यावर रत्नाबाईने मागून पकडून खाली पाडले. पायाच्या पोटरीवर दगड मारला तर मनोहरने छातीवर दगड मारून फेकला. तसेच मोटारीचे नुकसान करून विहिरीत फेकून दिली त्यावरून मारवड पोलीसात भादवि कलम ३२५, ५०४, ५०६, ४२७, ३४ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. दोन्ही गुन्ह्यांचा तपास हेकॉ राजेंद्र पाटील हे करीत आहेत.







