अमळनेर:- तालुक्यातील गलवाडे येथे गावठी दारू विकणाऱ्या महिलेवर मारवड पोलिसांनी छापा टाकत कारवाई केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सपोनि जयेश खलाने यांना मिळलेल्या गुप्त माहितीच्या आधारे सफौ किशोर पाटील, पोहेकाँ फिरोज बागवान, पोना सचिन निकम यांनी गलवाडे येथे भेट दिली असता भिल्ल वस्तीत बेबाबाई दगा भील ही घराच्या आडोश्याला हंडा व प्लास्टिक पिशवी घेवून बसलेली दिसून आली. छापा टाकला असता पोलिसांची चाहूल लागल्याने सदर महिला झाडाझुडपातून पळून गेली. त्या ठिकाणावरून १२०० रुपये किमतीची गावठी दारू मिळून आली. नमुने घेवून उरलेल्या मालाचा जागीच नाश करण्यात आला. मारवड पोलीसात मुं.प्रो. ॲक्ट ६५ ई अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.