
महसूल विभागाने पुन्हा रस्ता खोदला,
अमळनेर : तापी नदीतील वाळू चोरी रोखण्यासाठी नदीत टाकलेला मातीचा सेतु महसूल प्रशासनाने उध्वस्त केल्यानंतर वाळू माफियांनी पुन्हा जोडून वाळू चोरणे सुरू केल्याने उपविभागीय अधिकारी नितीनकुमार मुंडावरे यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभागाने पुन्हा रस्ता खोदून वाळू माफियांच्या नहेले पे दहेला दिला आहे.

तापी नदीत अमळनेर तालुक्यातील खापरखेडे ते चोपडा तालुक्यातील अनवर्दे दरम्यान वाळू माफियांनी मातीचा सेतू उभारून पद्धतशीर वाळू चोरी सुरू केली होती. उपविभागीय अधिकारी नितीनकुमार मुंडावरे याना माहिती मिळताच अमळनेर व चोपडा तहसीलदाराना आदेश देऊन सेतू जेसीबी मशीनच्या साहाय्याने तोडण्यात आला होता. मात्र प्रशासन एकदा कारवाई करून गेले की फिरकणार नाही या भ्रमात वाळू माफियांनी पुन्हा बांध व पाईप टाकून रस्ता सुरू केला आणि वाळू चोरी केली. ही बाब महसूल प्रशासनला कळताच उपविभागीय अधिकारी नितीनकुमार मुंडावरे यांनी पोलीस ताफ्यासह अमळनेर तहसीलदार रुपेशकुमार सुराणा , चोपडा तहसीलदार थोरात यांच्यासह तलाठी अनिल पवार व इतर अमळनेर आणि चोपडा तालुक्यातील तलाठी पथकाने पुन्हा हा रस्ता खोदून काढला आहे.
दरम्यान तापी नदी ही निम्न तापी प्रकल्प म्हणजे तापी महामंडळाच्या अंतर्गत येत असल्याने नदी पात्रात विना परवानगी पूल बांधणे बेकायदेशीर असल्याने त्यांच्यावर तापी महामंडळ सह महसूल प्रशासनाने संयुक्त कारवाई करावी म्हणून महामंडळाच्या अधिकाऱ्यांना तहसीलदार सुराणा यांनी कारवाई साठी बोलावले होते. मात्र त्यांचा प्रतिसाद दिसून आला नाही.
नदी पात्रात बेकायदेशीर रस्ता टाकून पात्रातील वाळूचा मोठ्या प्रमाणात उपसा झाला आहे. याबाबत सखोल चौकशी करून उचित कारवाई करण्यात येईल व संबंधित प्रत्येक विभागाला जबाबदारी सोपविण्यात येईल- नितीनकुमार मुंडावरे , उपविभागीय अधिकारी अमळनेर


