
अमळनेर : गलवाडे रस्त्यावरील सानेगुरुजी स्मारक प्रतिष्ठान च्या जागेवर पुन्हा एकदा समाजकंटकांनी आग लावल्याने अनेक झाडे जळाली. स्मारक समिती सदस्य ,अग्निशमन दल आणि नागरिकांच्या तत्परतेने आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळाले.
२३ रोजी अचानक सानेगुरुजी स्मारक प्रतिष्ठान च्या खुल्या जागेत कुरणाला आग लागली. त्याठिकाणी स्मारक समितीने हजारो झाडे लावली आहेत. जमिनीवरील गवत कोरडे झाल्याने आग पसरत होती. स्मारक समितीच्या कार्यवाह दर्शना पवार यांनी तात्काळ पालिकेचे मुख्याधिकारी तुषार नेरकर ,संजय चौधरी यांच्याशी संपर्क साधला. पालिकेच्या अग्निशमन दल प्रमुख गणेश गोसावी , फारुख शेख , जफर पठाण , आकाश संदानशीव ,लखन धनगर यांच्यासह दर्शना पवार आणि परिसरातील ग्रामस्थांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न केले. वेळीच आग विझल्याने मोठे नुकसान होण्यापासून बचाव झाला. यापूर्वी देखील असे प्रकार घडले आहेत. गुरे चारणारे अथवा शेतकऱ्यांनी बिडी अथवा सिगारेट पेटवल्यास आगीची शक्यता असते.
सानेगुरुजी स्मारक निधीअभावी रखडले आहे. यापूर्वी चंद्रकांत पाटील पालकमंत्री असताना जिल्हा नियोजन विभागाकडून कंपाऊंड साठी निधी मंजूर झाला होता. मात्र फक्त २० टक्के काम झाले आणि ८० टक्के काम रखडले. तसेच अजित पवार यांनीही निधीचे आश्वासन दिले होते मात्र निधी न मिळाल्याने साधे कंपाउंड देखील पूर्ण करता येत नाही. त्यामुळे गुराखी किंवा अन्य कोणी सहज प्रवेश करतात. नैसर्गिक मालमत्तेचे नुकसान करतात. स्मारक समितीने केलेल्या परिश्रमाची ,वृक्षांची हानी होते. सानेगुरुजींच्या कर्मभूमीत गुरुजींचे स्मारकासाठी शासन लक्ष देत नाही असा नाराजीचा सूर नागरिकांमधून उमटत आहे.